एक चमचा दुधाची किंमत ५० रूपये

donkey
दुधाच्या किंमती दिवसेनदिवस चढत चालल्या आहेत याची आपल्याला कल्पना आहेच पण १ चमचा दुधाची किंमत ५० रूपये असेल यावर आपला कदाचित विश्वास बसणार नाही. अर्थात हे दूध वाघिणीचे असेल असा अंदाज आपण व्यक्त कराल. पण हे दूध आहे गाढविणीचे. दक्षिण भारतातील बर्‍याच शहरातून असे गाढविणीची दूध विकले जात आहे आणि त्याला प्रचंड मागणीही आहे. आजपर्यंत उंटाचे दूध सर्वात महाग मानले जात होते मात्र गाढवाने उंटाला या बाबतीत मागे टाकले आहे.

विशाखापट्टणम येथे गाढविणीचे एक लिटर दूध २००० रूपये लिटर विकले जात आहे. तर बंगलोर, चेन्नई शहरात १ कप दुधाची किंमत आहे २०० रूपये. बंगलोर मधील कृष्णप्पा नावाचा युवक त्यांच्या लक्ष्मी नावाच्या गाढविणीचे दूध घरोघर जाऊन विकतो व तो १ चमचा दुधासाठी ५० रूपये घेतो. गाढविणीचे दूध हे अत्यंत औषधी मानले जाते व त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्यापासून अस्थमा, खोकला, थंडी या रोगांपासून आराम मिळतो. त्यामुळे तान्ह्या मुलांसाठी या दुधाला प्रचंड मागणी आहे. मुळात गाढवाला खूप दूध येत नाही म्हणजे दुध कमी असते व त्यामुळे त्याचा पुरवठा मागणीप्रमाणे होऊ शकत नाही हेही हे दूध महाग असण्यामागचे एक कारण आहे.