रघुराम राजन यांनी सादर केले अखेरचे पतधोरण

raghuram-raqjan
मुंबई – रघुराम राजन यांनी आज अखेरचे पतधोरण सादर केले असून आज पुन्हा व्याजदर (रेपो रेट) ‘जैसे थे’ ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६.५० टक्‍क्‍यांवर आणि रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) ४ टक्‍क्‍यांवर कायम ठेवले आहे.

आज जाहीर होणार्‍या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून मॉन्सूनची कामगिरी चांगली असली तरी चलनवाढीचा दर वाढल्याने व्याजदर जैसे थेच ठेवण्याची शक्‍यता आधीपासूनच वर्तवण्यात आली होती. विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे हे अखेरचे पतधोरण होते. आता यापुढील पतधोरणे समितीकडून जाहीर केली जाणार आहेत. पुढील पतधोरण आढावे सहा सदस्यीय समिती घेणार आहे. या समितीतील तीन सदस्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील.

राजन यांची तीन वर्षांची कारर्कीर्द त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि मुसद्देगिरीने गाजली. चलनवाढीचे चार टक्‍क्‍यांचे उद्दीष्ट आणि व्याजदर निश्‍चितीसाठी विशेष समितीची स्थापना या राजन यांच्या मागण्या सरकारला अखेर मान्य कराव्या लागल्या. राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ ४ सप्टेंबरला पूर्ण होत आहे.

Leave a Comment