आणखी सुलभ होणार एटीएममधून पैसे काढणे

rbi
नवी दिल्ली – ग्राहकांसाठी नव्या सेवा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) नवीन प्रकारची एटीएम लावण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून त्यानुसार एटीएममधून पैसे काढणे आणि बँक खात्यात पैसे भरणे सोपे होईल. आरबीआय यासाठी नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन आणि देशातील प्रमुख बँकाबरोबर मिळून नवीन फ्रेमवर्क तयार करत आहे.

सध्या देशात लावण्यात आलेल्या एटीएमचा वापर जास्त प्रमाणात पैसे काढण्यासाठी केला जातो. मात्र आरबीआयचा हा पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न असून पैसे काढण्याबरोबर ते जमाही करणे नवीन प्रणालीमुळे सोपे जाणार आहे. ग्राहकांना आपल्या बँक खात्यात पैसे जमा करणे सोपे होणार आहे. एटीएममध्ये गेल्यावर कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे भरणे सोपे होणार. यासाठी बँकेच्या शाखेत अथवा त्या बँकेच्या एटीएममध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

नवीन एटीएमचे मॉडेल ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता तयार करण्यात येईल असे एका सरकारी बँकेच्या अधिका-याने सांगितले. या पेमेन्ट बँकेच्या ग्राहकाला पीओएस मशीनच्या आधारे रोख रक्कम ठेव स्वरुपात ठेवण्याची सुविधा मिळणार. याचप्रमाणे एटीएममधून पैसे काढण्याच्या सध्याच्या मर्यादेबाबत सुधारणा करण्यात येतील.

या व्यतिरिक्त अर्थ मंत्रालयाने बँकांना जास्तीत जास्त मायक्रो एटीएम लावण्याचे निर्देश दिले आहे. यानुसार आधार कार्ड वाचणारे एटीएम लावण्यात येणार. हे हाताने वापरण्याचे उपकरण असेल. दुकानांमध्ये कार्डच्या माध्यमातून पेमेन्ट करण्यासाठी असणा-या उपकरणाप्रमाणे हे असेल. या मशीनला मोबाइलबरोबर जोडता येईल. यामध्ये एटीएम कार्ड स्वॅप करणे, पासवर्ड टाकणे आणि स्लिप प्रिन्ट करण्याची सुविधा असेल.

Leave a Comment