रेल्वे अजूनही सांभाळतेय गुलामगिरीचे जोखड

shakuntala
येत्या १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र होऊन ६९ वर्षे होतील मात्र अजूनही रेल्वे विभाग ब्रिटीशांच्या गुलामगिरीची निशाणी सांभाळत असून त्या पोटी दरवर्षी १ कोटी २० लाख रूपये रॉयल्टी म्हणून देत आहे. अमरावती ते मूर्तजापूर हा नॅरो गेज मार्ग अजूनही ब्रिटीश कंपनीच्या मालकीचा आहे व तो वापरण्याबद्दल भारतीय रेल्वेकडून त्यांना रॉयल्टी दिली जात आहे. हा मार्ग खरेदी करण्याचा प्रयत्न रेल्वेविभागाने अनेकदा केला मात्र कांही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झालेले नाही.

या मार्गावर धावणारी एकुलती गाडी म्हणजे शकुंतला एक्स्प्रेस ही पॅसेंजर ट्रेन. अमरावती ते मूर्तजापूर हे १८९ किमीचे अंतर तोडायला या गाडीला ६ ते ७ तास लागतात. १०० वर्षांची जुनी ही सात डब्यांची गाडी दररोज हजार प्रवासी वाहून नेते. अमरावतीतील कापूस मुंबईला पाठविता यावा यासाठी हा मार्ग टाकला गेला होता. या मार्गावरचे सिग्नल अजूनही ब्रिटीशकालीन आहेत. या मार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी ब्रिटीश कंपनीची आहे मात्र रॉयल्टी घेऊनही त्याची देखभाल मात्र केली जात नाही असे समजते. आजही ही रेल्वे तोट्यातच चालविली जात आहे.

१९०३ साली ब्रिटीश कंपनी क्लक निक्सनने या मार्गाचे काम सुरू केले ते १९१६ मध्ये पूर्ण झाले. १८५७ साली स्थापन झालेल्या या कंपनीचे नांव आता सेंट्रल प्रोव्हीन्स रेल्वे असे आहे. १९५१ मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण केले गेले मात्र या मार्गाचे राष्ट्रीयीकरण झालेले नाही. २०१४ व २०१६ ला हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता मात्र स्थानिक खासदार आनंद राव यांनी तो पुन्हा सुरू करणे भाग पाडल्याचेही सांगितले जाते. राव यांच्या मते हा रूट म्हणजे अमरावतीकरांची लाईफलाईन आहे. तो बंद झाला तर हजारो गरीबांची अडचण होणार आहे. राव यांनी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे असा प्रस्ताव रेल्वेला दिला आहे.

Leave a Comment