चहूदिशांनी फिरणारे शिवलिंग

shivpuri
सध्या श्रावण महिना सुरू आहे. या काळात भाविकांची शंकराच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी होत असते. भारतात शेकड्यांनी शिवालये आहेत. प्रत्येकाचे कांही ना कांही खास वैशिष्ठही आहे. मध्यप्रदेशातील शोपूर किंवा मुळचे शिवपूर येथील गोविंदेश्वर महादेव नावाचे मंदिर असेच वैशिष्ठपूर्ण आहे. असे सांगितले जाते की या मंदिरातील शिवलिंग प्रथम महाराष्ट्रातील सोलापूर येथे बांबेश्वर महादेव या नावाने मंदिरात स्थापन केलेले होते. मात्र नंतर ते शिवभक्त गौड राजा पुरूषोत्तमदास याने १७२२ साली शिवपूर नगर वसवून तेथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून बसविले. असे उल्लेख या मंदिरातील शिलालेखावर केले गेले आहेत.

या शिवलिंगाचे वैशिष्ठ म्हणजे हे शिवलिंग चारीबाजूंनी फिरू शकते. सर्वसाधारणपणे शिवलिंगांची स्थापना दक्षिणोत्तर दिशेने केलेली असते. मात्र हे शिवलिंग भाविकांच्या सोयीनुसार कोणत्याही दिशेने फिरविता येते. लाल पत्थरातील या शिवलिंगाचे दोन भाग आहेत. एक पिंडी व दुसरी जलहरी. एका मोठ्या दगडात खळगा करून त्यात हे शिवलिंग बसविले गेले आहे. या ठिकाणीही श्रावणात व दर सोमवारी शिवभक्तांची मोठी गर्दी होत असते.

Leave a Comment