बंगालमधले झपाटलेले रेल्वेस्टेशन होणार पर्यटन स्थळ

bangal
प.बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील बेगुनकोदोर हे रेल्वे स्थानक झपाटलेले असल्याच्या कल्पनेने गेले कित्येक वर्षे बंदच आहे. हे स्टेशन म्हणजे भूताचे निवासस्थान आहे व येथे जाणारा जिवंत परत येत नाही असेही स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. परिणामी हे रेल्वेस्टेशन गेली कित्येक वर्षे वापरात नाही. मात्र आता या स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून वापर करण्याच्या हालचाली सुरू असून साहसी पर्यटकांना या हॉटिंग स्टेशनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास फिरण्याची संधी दिली जाणार आहे. एका पॅरानॉर्मल रिसर्च टीमने त्यासाठी पुढाकार घेतला असून स्थानिक टूर ऑपरेटरच्या मदतीने ही सहल करता येणार आहे. विशेष म्हणजे भारतात अशा घोस्ट टूरिझमला अजून अधिकृत मान्यता नाही.

bangal1
भारतातल्या स्टेशन्समध्ये हे सर्वात भीतीदायक रेल्वे स्टेशन मानले जाते. १९६७ साली प्रथम एका रेल्वे कर्मचार्‍याने या स्टेशनवर पांढरी साडी नेसलेली भुतीण पाहिली व नंतर तिचे दर्शन वारंवार घडू लागल्याने येथील कर्मचारी अधिकार्‍यांनी काम थांबविले व हे स्टेशन बंद पडले. २००९ साली ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी हे स्टेशन पुन्हा सुरू केले मात्र तिकडे एकही प्रवासी फिरकला नाही. आता मात्र बंगाल राज्याच्या पर्यटन नकाशावर हे स्टेशन आणले जाणार आहे.

या टूरमध्ये पर्यटकांना आकर्षक पॅकेज दिले जाणार आहे. त्यात प्रवास, हॉटेल व मध्यरात्री या स्टेशनची सफर यांचा समावेश आहे. त्यात या स्टेशनचा इतिहासही सांगितला जाईल. पॅरानॉर्मल टीमचे सदस्य सुमन रॉय म्हणाले की आम्ही आमची पहिली टूर लवकरच नेत आहोत व ती रोमांचक असेल याची खात्री आहे.

Leave a Comment