वाहतुकीचे नियम कडक

traffic
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खाते आले तेव्हाच त्यांनी वाहतूक विषयक नियमात मोठे बदल केले जातील अशी घोषणा केली होती. ती घोषणा आता प्रत्यक्षात येणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना अधिक कडक शिक्षा देण्याची तरतूद असणारा कायदा केला जाणार आहे आणि त्या संबंधीच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंंजुरी दिली आहे. सध्या आपल्या देशामध्ये दलितांमधील अत्याचार आणि अल्पसंख्य मुस्लीमांवरील अत्याचार याच्या संबंधाने खूप चर्चा सुरू आहे. आणि काही माध्यमातून त्यांच्यावर अतिशयोक्त चर्चासुध्दा होत आहे. परंतु या विषयावर एवढी चर्चा सुरू असताना दुसर्‍या बाजूला सरकार धाडसाने आणि कार्यक्षमतेने अतीशय वेगवान निर्णय घेत आहे. त्याकडे मात्र लोकांचे लक्ष नाही. जीएसटी विधेयकामुळे सरकारच्या सुधारणाविषयक पावलांमध्ये मोठी भर पडली आहे आणि या विधेयकाच्या पाठोपाठ सरकारने आता वाहतुकीच्या नियमांकडे आपले लक्ष वळवले आहे. वाहतुकीचे नियम कडक करणारे विधेयक हे काही घटनादुरूस्ती विधेयक नाही. त्यामुळे ते संसदेच्या दोन्ही सभागृहात साध्या बहुमतानेसुध्दा मंजूर करता येते.

या विधेयकावर खूप चर्चा होईल आणि ते काही सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात मंजूर होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. परंतु पुढच्या अधिवेशनात का होईना या वाहतूक विषयक विधेयकाला मंजुरी मिळू शकते. या विधेयकाला एक पार्श्‍वभूमी आहे. त्यानुसार भारतात लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींमध्ये रस्त्यावरचे अपघात हे एक मोठे कारण आहे. आपल्या देशातले लोक वाहतुकीविषयी म्हणावे तेवढे सजग नाहीत. त्यामुळे देशात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात. हे प्रमाण भयानक आहे. देश मोठा आहे, लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे अधिक अपघात होणे साहजिक आहे. असे समर्थन केले जाते. परंतु प्रगत देशातील अपघाताच्या प्रमाणाशी तुलना केली असता भारतातल्या रस्ते अपघातांचे प्रमाण जास्तच दिसते. विशेषतः देशाची लोकसंख्या जास्त असली तरी वाहनांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. पण वाहने एवढी कमी असतानासुध्दा दरवर्षी ५ लाख अपघात व्हावेत हे दुर्दैवाचेच आहे. दरसाल ५ लाख अपघात याचा अर्थ दररोज १४३० अपघात असा होतो. यातले काही अपघात किरकोळ असले तरी दरसाल दीड लाख लोक रस्त्यावरच्या अपघातात मरण पावतात. याही प्रमाणाची आकडेवारी काढली असतात असे दिसते की भारतात दररोज ४०० लोक स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या तरी बेपर्वाईमुळे अपघातात जीव गमावतात.

या आकडेवारीचे अधिक विश्‍लेषण करण्यात आले तेव्हा असे आढळले की वाहतुकीतली बेपर्वाई कमी झाली तर अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र वाहतुकीच्या बाबतीत बेपर्वाई केली किंवा नियम मोडला तर फार मोठी शिक्षा होत नाही आणि त्यामुळेच लोक बेपर्वाईने वाहने चालवतात. म्हणूनच सरकारने आता नियम मोडणार्‍यांना अधिक कडक शिक्षा करण्याची तरतूद करण्याचे ठरवले आहे. सध्या वाहतुकीचा नियम मोडला म्हणजेच चौकातले सिग्नल न पाळता वाहतूक केली तर १०० रुपये दंड होतो. आता वाढत्या महागाईनुसार लोकांना १०० रुपयांचे काहीच वाटत नाही. म्हणून ते चुकीच्या दिशेने बिनदिक्कतपणे वाहने नेतात. पण आता हा दंड १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात येणार आहे. अशा प्रकारे दंड आकारला गेला आणि वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना खरोखर तो ठोठावला गेला तर निश्‍चितपणे त्याचा धाक लोकांना वाटायला लागेल. वाहतुकीचे नियमन करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचा आदेश न जुमानणार्‍या वाहनधारकाला ५०० रुपये दंड केला जातो. तो आता २ हजार रुपये करण्यात येणार आहे.

अशाच रितीने सैराट वाहने चालवणार्‍यांना १ हजार रुपयांच्या ऐवजी ४ हजार रुपये दंड भरावा लागेल. वाहनाचा विमा काढलेला नसल्यास चक्क ३ महिने तुरुंगवास सहन करावा लागेल. सध्या कमी वयाची मुले बिनदिक्कतपणे आणि बिनधास्तपणे गाड्या चालवतात. अशा मुलांनी अपघात केल्यास त्यांच्या पालकांना दंड ठोठावला जाणार आहे. विशेषतः मालमोटारींचे चालक गाडीमध्ये भरमसाठ माल भरून नेतात आणि त्यामुळेही अपघात होतात. अशा मालमोटारीच्या मालकांना आता ठोठावला जाणारा दंड २० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. दारूच्या नशेत वाहने चालवून इतरांच्या जीवास धोका निर्माण करणार्‍या मस्तवाल वाहनधारकांना आता त्यांच्या गाडीचा उपद्रव होणार्‍याला २५ हजार भरपाई द्यावी लागते. ती आता २ लाख रुपये करण्यात येणार आहे. एकंदरीत वाहतुकीचे नियम मोडण्याबाबत आता विचारच करावा लागणार आहे. नियम मोडला तर चिरीमिरी देऊन सुटका करून घेण्याची प्रवृत्ती होती तिच्याऐवजी जबर दंड भरावा लागणार आहे. एकंदरीत रस्त्यावरील वाहतुकीच्या बाबतीत जी बेपर्वाई दाखवली जात होती तिच्यावर अंकुश बसण्यास हा नवा कडक कायदा उपयुक्त ठरणार आहे. असे असले तरी रस्त्यावरील अपघातांना वाहनांची अवस्था, रस्त्यांची अवस्था हेही कारणीभूत असतात. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते आणि वाहने यांच्यातही सुधारणा करण्याची गरज आहे.

Leave a Comment