ट्री गणेशाला वाढती मागणी

bij-ganesh
मुंबई- गणेशोत्सवाचे पडघम आता वाजू लागले आहेत. यंदाच्या वर्षातही कच्चा मालाचे भाव गगनाला भिडले असल्याने गणेशमूर्तींच्या किंमती वाढल्याचे दिसून येत आहे. याच धामधुमीत यंदा ट्री गणेशसाठी मोठी मागणी येत आहे. दत्ता कोठूर या तरूण कलाकाराने निर्मिलेल्या या गणेश मूर्तींसाठी आत्ताच ५ हजारांपेक्षा अधिक मागणी आली आहे मात्र कोठूर यांनी ५०० मूर्तींसाठीचे बुकींग घेतले आहे.

ganesh1
ट्री गणेश ही संकल्पना राबविणारे कोठूर मुंबईच्या ओ अॅन्ड एम कंपनीत वरीष्ठ आर्ट डायरेक्टर आहेत. दरवर्षी मातीच्या मूर्तींमुळे होत असलेले प्रदूषण कमी करता यावे व भाविकांना गणेशपूजनाचा पुरेपूर आनंद व समाधान मिळावे यासाठी त्यांनी ट्री गणेश तयार केला. त्याचा व्हिडीओ खूपच गाजला व यंदा अनेकांनी अशा मूर्तीसाठी नोंदणी केली. यात लाल मातीपासून कुंडीसारख्या आकाराच्या मातीच्या पात्रातच गणेशाची मूर्ती बनविली जाते. ही माती खतमिश्रित असते. त्यापासून गणेश मूर्ती बनविताना त्यात भाज्यांची बियाणी पेरली जातात. गणेश पूजन झाल्यानंतर ही मूर्ती त्याच कुंडीत पाणी ओतून विसर्जित केली की त्याची माती बनते व सात आठ दिवसांत त्यातील बिया रूजून रोपे तयार होतात. त्यातून तयार झालेली भाजी भाविक गणेशाचा प्रसाद म्हणून वापरू शकतात. सुरवातीला यात भेंडीच्या बिया पेरल्या गेल्या होत्या व तो प्रयोग खूपच यशस्वी झाला.

ganesh
कोठूर सांगतात मला यातून पैसा मिळवायचा नाही.त्यामुळे ही मूर्ती कशी बनवायची याचे मार्गदर्शन आम्ही व्हिडीओतून करतो आहोत. आमची वेबसाईट आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही त्याचा प्रचार प्रसारासाठी हातभार लावला आहे. लोकांत पर्यावरण जागृती करतानाच सणाचा आनंदही मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. अनेकदा या मूर्ती विसर्जन करताना पायदळी येतात हे पाहूनच आम्ही ट्री गणेश ही संकल्पना राबविली आहे. त्यांचे गुरू सूर्यकांत शिंदे यांनी ही मूर्ती कशी बनविता येईल याचे मार्गदर्शन केले व कोठूर त्यांच्या पाच सहा मित्रांच्या मदतीने हा उपक्रम राबवित आहेत.

Leave a Comment