अडीच हजार वर्षांच्या अंधारानंतर येथे उजळले सौर दिवे

fuktal-valley
भारताचा पर्यटनाच्या दृष्टीने लोकप्रिय होत असलेला भाग म्हणजे लेहलडाख. या दुर्गम प्रांतात अनेक मॉनेस्ट्रीज आहेत आणि त्यात पारंपारिक रितीने आजही धर्मपठण केले जाते. अशीच एक मॉनेस्ट्री म्हणजे झंस्कार व्हॅलीतील फुकतल गोंपा. अडीच हजार वर्षे जुनी असलेल्या या गोंपात प्रथमच सौर ऊर्जेवर चालणार्‍या एलईडी लाईटचा प्रकाश पसरला आहे. चंदिगढच्या ग्लोबल हिमालयन एक्सपिडीशनचे संस्थापक पारस लंबा यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. या लाईटचा प्रकाश येथील लोकांना अत्यंत नवलाचा वाटत आहे कारण त्यांनी आजपर्यंत असे दिवे पाहिलेलेच नाहीत. या मठात तेलाचे दिवे जाळूनच प्रकाश मिळविला जात होता. सौर उर्जा दिवे प्रकाशल्याबरोबर येथील लोकांनी त्यांची पूजा केली. अनेकांनी हा चमत्कार मानला व तर बर्‍याच जणांना अश्रू आवरेनात असा अनुभव लांबा यांनी सांगितला. या दिव्यात तेल कुठून येतेय हा प्रश्नही वारंवार विचारला जात होता.

लांबा सांगतात या दुर्गम ठिकाणी आमच्या सौर सामग्रीसह पोहोचण्यास १२ दिवस लागले. कांही प्रवास बसमधून, कांही सायकलवरून ते कांही पायी केला गेला. रस्त्यावर बर्फ असल्याने प्रवासात अडचणी येत होत्या. येथे सोलर मायक्रो ग्रीडसच्या सहाय्याने सौर उर्जा निर्माण केली जात आहे. या मठात १७० खोल्या आहेत व हा मठ आता सौर ऊर्जेने झळाळला आहे. या परिसरातील ११ गांवे गेल्या दीड वर्षात या प्रकारे प्रकाशमय करण्यात आली आहेत. यंदाच्या वर्षात आणखी ४० गावात सौर उर्जा पोहोचविली जाणार आहे. एका सोलर मायक्रो ग्रीडमुळे ३० एलईडी दिवे पेटू शकतात व १ ग्रीडसाठी येणारा खर्च आहे दीड लाख रूपये.