१० हजार कोटींच्या कंपनीचा मालक एकेकाळी विकायचा पेपर!

ambrish-mitra
लंडन – कोलकात्यात अंबरीश यांचा जन्म झाला. धनबादेत बालपण गेले. दिल्लीत बिझनेसची कल्पना सुचली आणि लंडनमध्ये कंपनी सुरू केली. अंबरीश केवळ ५ वर्षांत १० हजार कोटींच्या ब्लिपर या कंपनीचे मालक आहेत. १७० देशांत तिचे ६.५ कोटी युजर्स आहेत. स्लमडॉग मिलेनियरसारखीच आहे अंबरीश यांची कहाणी. अंबरीश मित्रा असे त्यांचे पूर्ण नाव आहे. रिश असेही त्यांना संबोधले जाते.

अंबरीशचे मन शाळेत कमी लागायचे. मुलाने इंजिनिअर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. मात्र अंबरीशला संगणक प्रिय होता. शेवटी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याचे वय १५ वर्षे होते. वडिलांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुंबईला जात आहे. पण हीरो बनण्यासाठी नाही, असे म्हटले होते. पण रस्त्यात विचार बदलला. ते दिल्लीला गेले. तेथे एका झोपडपट्टीत जागा मिळवली. खर्च भागवण्यासाठी अंबरीश यांनी पेपर विकले. हॉटेलमध्ये काम केले. एके दिवशी पेपरमध्ये जाहिरात पाहिली. तिच्यात बिझनेसची कल्पना मागवली होती. ५ लाखांचे बक्षीस होते. अंबरीशनी महिलांना मोफत इंटरनेट देण्याची कल्पना दिली. तिला बक्षीस मिळाले. त्यातूनच अंबरीशने ‘वुमेन इन्फोलाइन’ सुरू केली.

आता ३७ वर्षीय अंबरीश म्हणतात, मी तेव्हा चांगला लीडर नसल्याने कंपनी नफ्यात नव्हती. २००० मध्ये कंपनी सोडली. इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे टेक्नॉलॉजी कंपनी सुरू करायची होती, पण जमले नाही. होते ते पैसे खर्च झाले. दरम्यान दारूची सवय लागली. एक दिवस लंडनच्या एका पबमध्ये उमर तय्यब (ब्लिपरचे सहसंस्थापक) या मित्रासोबत बसलो होतो. शेवटच्या पेगसाठी मी काउंटरवर १५ डॉलर ठेवले व गमतीने म्हणालो, नोटांमुळे महाराणी एलिझाबेथ बाहेर आली असती तर किती बरे झाले असते? ही गंमतच बिझनेस कल्पना बनली. उमरने माझा फोटो घेतला आणि तो महाराणीच्या फोटोसोबत सुपर इंपोज केला. मग आम्ही हा अॅप डेव्हलप करण्याचा विचार केला आणि अशा प्रकारे ‘ब्लिपर’ कंपनीचा जन्म झाला.

Leave a Comment