रसेश्वर महादेव- पार्‍याचे शिवलिंग असलेले पवित्र स्थान

parad
छत्तीसगढ या निसर्गाने संपन्न असलेल्या राज्यात अशी अनेक मंदिरेही आहेत की वैशिष्ठपूर्ण म्हणता येतील. राजधानी रायपूरजवळ असलेले रसेश्वर महादेव मंदिर हे त्यातील एक. श्रीश्रीधाम, सुमेरू मठ, औघडनाथ दरबार अशा नावाने ओळखल्या जाणार्‍या या ठिकाणाचे महत्त्व आहे ते मंदिरात स्थापन केलेल्या पार्‍याच्या शिवलिंगामुळे. यालाच पारद शिवलिंग असेही म्हटले जाते व अशी शिवलिंगे अत्यंत दुर्मिळ असतातच पण पारद शिवलिंग धातू, दगडाच्या लिंगपेक्षा सर्वश्रेष्ठही मानले जाते.

या मंदिराचे दुसरे वैशिष्ठ म्हणजे येथे अहोरात्र अन्नदान सुरू असते व ते केवळ माणसांसाठी नाही तर निराधार अन्य सजीवांसाठीही असते. म्हणजेच येथे रात्रंदिवस भुकेली कुत्री, डुकरे,गायी, बैल अशा मुक्या प्राण्यांना व भुकेल्या माणसांनाही खिचडी प्रसाद दिला जातो.श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे विशेष पूजा केली जाते. आणखी एक विशेष म्हणजे येथील सेवाकार्य, पूजा, नैवैद्य, अग्निहोत्र महिलेच्या हातून होते. माँ नावाने ओळखल्या जाणारी ही महिला बाबा औघडनाथांच्या शिष्या आहेत. येथे अखंड अग्निहोत्र आहे. बाबांचे शिष्य प्रचंड वेगनाथ या मठाची सर्व व्यवस्था पाहतात.

या मंदिराचा घुमट हा श्रीयंत्र घुमट असून हे श्रीयंत्र जगातील अद्वितीय असल्याचे सांगितले जाते. बाबा प्रचंड वेगनाथ येथे ध्यान, योग, आयुर्वेद, अध्यात्म आणि सनातन संस्कृतीचे शिक्षणही देतात. या मंदिरात दररोज रात्री गावात फिरून उपाशी सजीवांना म्हणजे माणसे व प्राण्यांना अन्न दिले जाते. त्याला नाथप्रसाद असे म्हणतात. जीवनातील संकटांनी त्रासलेले भाविक या मंदिरात येऊन प्रार्थना करतात व त्याची संकटे हरण होतात असेही सांगितले जाते.

Leave a Comment