कामगाराच्या मुलीचे संशोधन; एक्झॉस्ट फॅनच्या हवेतून केली वीजनिर्मिती!

fan
औरंगाबाद – थॉमस एडिसनने विजेचा शोध लावून जग प्रकाशमान केले. पण आता वीजच वापर वाढल्याने अपुरी पडत असून जगभर त्यासाठी संशोधन सुरू असताना औरंगाबादेतील इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय पूनम बडगुजर हिने एक्झॉस्ट फॅनमधून बाहेर पडणाऱ्या हवेवर वीजनिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

या विजेवर ७ ते २२ वॅटचे बल्ब लावून पाहिले आहेत. शिवाय वाळूजमधील एका कंपनीतही शेडमधील एक्झॉस्टच्या हवेतून अर्धा मेगावॅट विजनिर्मिती करणारा प्रकल्प तिने साकारला आहे. अशा पद्धतीने वीजनिर्मिती करणारी राज्यातील ही पहिलीच कंपनी ठरणार आहे. कामगाराची मुलगी असलेल्या पुनमने आपले संशोधन पेटंटसाठी पाठवले असून हर्सूल भागात राहणारे राजू बडगुजर बजाज कंपनीत कामगार आहेत. त्यांची मुलगी पूनम वाळूजमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकते. इलेक्ट्रॉनिक्स टेलि-कम्युनिकेशन शाखेत शिकणाऱ्या पूनमने आधी कॉलेजमध्येच एक्झॉस्ट फॅनमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेवर वीजनिर्मितीचा प्रयोग करून बघितला. त्यावर ७ ते २२ वॅटचे बल्ब उत्तमरीत्या उजळल्याने प्रयोग यशस्वी झाला. वाळूज परिसरातीलच उत्कर्ष इंडस्ट्रीजचे रमाकांत पूलकोंडवार यांना या प्रयोगाची माहिती मिळाली. महाविद्यालयात जाऊन त्यांनी हा प्रयोग बघितला आणि आपल्या कंपनीसाठी तो अंमलात आणण्याची विनंती पूनमला केली.

मोठमोठे एक्झॉस्ट फॅन कंपनीच्या शेडवर उंचावर असतात. त्यांचे आरपीएम मोजले तेव्हा प्रचंड गतीने फिरणाऱ्या या एक्झॉस्टवर हा प्रयोग चांगला यशस्वी होऊ शकतो हे पूनमच्या लक्षात आले. बरेच संशोधन करून तिने कंपनीला यासाठी एक प्रोजेक्ट तयार करून दिला. शिवाय आपले हे संशोधन पुणे येथील व्हीट्सकीपर या संस्थेकडे पेटंटसाठीही तिने पाठविले. शून्य पैशातून विजनिर्मिती असा संदेश तिने पेटंटमध्ये दिला असून, जगभरातील उद्योजकांना हा प्रयोग अमलात आणता येऊ शकेल, असे म्हटले आहे.

पूनमने एक्झॉस्ट फॅनचे कायम फिरते ब्लेड आणि त्याच्या गतीपासून विजनिर्मिती शक्य असल्याचे सिद्ध केले. हवेवर फिरणारे पाते, बॅटरी, लोहचुंबक या उपकरणांच्या वापरातून ७ वॅटचा बल्ब् २४ तास इतर कोणतीही ऊर्जा न वापरता उजळता ठेवला. यंत्रात सुधारणा करून संपूर्ण घराला पुरेल अशी विजनिर्मिती करण्याचा पुनमचा प्रयोग सुरू आहे. या संशोधनात पुनमला इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलंस इनजिनिअरींग अँड मॅनेजमेंट या कॉलेजचे विभागप्रमुख हेमंत जाधव, प्रा. रोहिणी पैठणे, अमोल पवार यांचे सहकार्य मिळाले. शिवाय प्रियांका गव्हाणे, अंकुश अनपट या सहकाऱ्यांची मदत झाली.

Leave a Comment