नवी दिल्ली: आता इंग्रजी बरोबरच हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये ई मेल आयडी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि भारतीय कंपनी रेडीफ अशा कंपन्या ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देतील.
भारतीय भाषांमध्येही मिळणार ई मेल आयडी
देशभरातील ग्रामीण भागातही आता इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण अल्पशिक्षित जनतेलाही संपर्काची ई मेलसारखी साधने उपलब्ध व्हावी; यासाठी भारतीय भाषांमधून ई मेल आयडी उपलब्ध करून देण्यात यावे; अशी सूचना केंद्राने सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांच्या बैठकीत केली आहे.
‘भारत नेट प्रोजेक्ट’ अंतर्गत लवकरच देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ‘हाय स्पीड इंटरनेट’ने जोडल्या जाणार आहेत. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना ही सुविधा वापरणे सुलभ व्हावे यासाठी अशा सुविधा आवश्यक आहे; असे मत माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचे संयुक्त सचिव राजीव बन्सल यांनी व्यक्त केले. देशात मोठ्या प्रमाणात असे नागरिक आहेत; की ज्यांना इंग्रजी वाचता अथवा टाईप करता येत नाही. त्यामुळे इंटरनेट सुविधा सक्षमपणे वापरण्यासाठी त्यांना त्यांच्या मातृभाषेतील ई मेल आयडी मिळणे आवश्यक आहे; असे ते म्हणाले.
भारतीय भाषेतून ई मेल आयडी उपलब्ध करून देण्याबाबत गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि रेडीफच्या प्रतिनिधींनी अनुकूलता व्यक्त केली. मात्र सरकारने ही सेवा अनिवार्य करण्यापेक्षा कंपन्यांना या सुविधा देण्यास प्रोत्साहन द्यावे; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.