बहादूरशहा जफरचा महाल दुरावस्थेत

jafar
शेवटचा मुघल बादशाह बहादूरशाह जफर यांचा उन्हाळ्यात वापरायचा महाल दुरावस्थेची शिकार बनला आहे. दिल्लीच्या कुतुबमिनार जवळच असलेला हा महाल बादशाह अकबर याने बांधला होता. सध्या हा महाल पुरातत्त्वविभागाच्या अखत्यारीत आहे तरीही या ऐतिहासिक वास्तूला चारी बाजूंनी उंच इमारतींचा गराडा पडल्याने सहजासहजी तो लक्षातही येत नाही अशी त्याची अवस्था झाली आहे.

लाल दगडातला तीन मजली भव्य दरवाजाचे बांधकाम १८ व्या शतकात बहादूरशाहने केले होते. हत्ती दरवाजा या नावाने हा दरवाजा ओळखला जातो. त्याच्यावर असलेले सज्जे व खिडक्यांवर असलेली बंगाली वास्तूकला जीर्ण बनली आहे. पूर्वी हा महाल अरवली पर्वताच्या पहाडांनी वेढलेला होता व उंच छतामुळे हा महाल उन्हाळ्यातही अतिशय थंड राहात असे. वास्तविक नियमानुसार ऐतिहासिक संरक्षित वास्तूंच्या परिसरात १०० मीटर पर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही मात्र येथे हा नियम पायदळी तुडविला गेल्याचे दिसून येत आहे.

mashid
या महालाला अवैध बांधकामांचा गराडा पडला आहेच पण महालाच्या पडीक भागात अनेक फकीर वास्तव्यास आहेत. महालात असलेली संगमरवरी मोती मशीद बरीचशी सुस्थित आहे. याच महालात बाहशाह अकबर व मिर्जा जहांगीर यांच्या कबरी आहेत मात्र त्यांचीही दुरावस्था झाली आहे. १८५७ च्या बंडात बहादूरशहा जफर याने महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याची शेवटची इच्छा या महालातच त्याचेही दफन व्हावे अशी होती मात्र ब्रिटीशांनी त्याला पकडून रंगूनला पाठविले व तेथेच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment