छत्तीसगडमधील अभिनव उपक्रम; घरांवरील पाट्यांवर मुलींची नावे

girls
रायपूर – सर्वसामान्यपणे सर्वच घरांवरील पाट्यांवर कुटुंबप्रमुखाचेच नाव असते. पण छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातील गावांत अशा पाट्या घरातील शालेय मुलींच्या नावे लावण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने मुलींचे शिक्षण, समाजात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

मार्काटोला गावातील नववीत शिकणारी पेमिना साहू तिच्या नावाची पाटी घरावर लागली तेव्हा हरखून गेली होती. अन्य गावांमध्येही विविध वयोगटातील दोन हजार ७०० मुलींच्या नावाने पाट्या त्यांच्या घरावर लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत मुलींच्या नावे पाटी लावण्याच्या उपक्रमाला मूर्त रूप देण्यात आले. दोंडी व गुंडेरदी विभागातील १२ गावांमधून याला मोठा प्रतिसाद मिळाला. मुलींचे शाळा गळतीचे प्रमाणही यामुळे कमी झाले.

आपले घर आपल्या नावाने ओळखले जाईल, अशी कल्पनाही कधी न केलेल्या पेमिनासारख्या अनेक मुलींनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या योजनेद्वारे आमचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. तसेच मुलींकडे बघण्याचा ग्रामस्थांचा दृष्टिकोनही बदलत आहे, अशी प्रतिक्रिया पेमिनाने व्यक्त केली. उकारी-दोंडी गावातील जागृती टिकम म्हणाली, हा उपक्रम राज्याच्या कानाकोपर्‍यात पोचला पाहिजे.

Leave a Comment