पुद्दुचेरी- भारतातच फ्रान्सचा घ्या अनुभव

pudducheri
फिरण्याची आवड असलेल्यांच्या पर्यटन स्थळे यादीत फ्रान्स देशाचे नांव नक्की असतेच. एकदा का होईना या देशाला भेट देण्याची स्वप्ने पर्यटक पाहात असतात. मात्र त्यासाठी होणारा खर्च विचारात घ्यावा लागतो. शिवाय व्हिसा, पासपोर्ट हवाच. जादा पैसा खर्च न करता व व्हिसा, पासपोर्टचे झंझट न करताच पर्यटकांना फ्रान्समध्ये फिरल्याचा आनंद भारतातच मिळू शकतो. त्यासाठी भेट द्यायला हवी पूर्वीची पाँडिचेरी म्हणजे आताची पुद्दुचेरीला. हा केंद्रशासित प्रदेश असून येथे १६७३ साली सर्वप्रथम फ्रेंच लोकांनी वसाहत केली होती. त्यानंतर हा भाग १९५४ साली भारताचा हिस्सा बनला तरी आजही येथील फ्रेंच ठसा पुसला गेलेला नाही.

या सुंदर पर्यटनस्थळी आवर्जून पाहावीत अशी अनेक सुंदर स्थळे आहेत. येथील सुंदर समुद्रकिनारा हे असेच नितांतरम्य स्थळ. या शहराची नगररचना फ्रान्समधील शहरांशी साध्यर्म दाखविणारी आहे.हा भाग व्हाईट टाऊन नावाने ओळखला जातो. येथे अनेक महापुरूषांचे पुतळे उभारले गेले आहेत त्यातील प्रॉमिनाड बीचवर जास्त पुतळे आहेत. येथेच म.गांधींचा पुतळा व त्याच्यापुढे असलेले फ्रेंच वॉर मेमोरियल पाहायला हवे असे. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या फ्रेंच जवानांच्या स्मरणार्थ हे मेमोरियल उभारले गेले आहे.

pudducheri1
येथेच योगी अरविंद यांचा आश्रम असून येथेही मोठ्या संख्येने लोक भेट देत असतात. निरव शांततेचा अनुभव येथे घेता येतो व मेडिटेशनसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. गणेश का मनाकुला म्हणजेच कुलॉन मंदिर हे प्राचीन स्थळ आवर्जून पाहायलाच हवे. १६७३ पूर्वीचे हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. येथील वैशिष्ठ म्हणजे भाविक येथे हत्तीच्या सोंडेत नाणी देऊन हत्तीकडून आशीर्वाद घेतात.

Leave a Comment