तब्बल १० हजार खोल्यांचे हॉटेल

hotel
लग्झरी हॉटेल्स उभारण्यात अग्रणी असलेल्या दुबईला मागे टाकत सौदी अरेबियात जगातले सर्वात मोठे व आलिशान हॉटेल बांधले जात असून ते २०१७ मध्ये तयार होणार आहे. एखाद्या महालासारखे दिसणारे हे हॉटेल पवित्र स्थळ मक्केच्या मध्यात असलेल्या मनोफिया नावाच्या भागात उभारले जात असून अब्राज कुदई असे त्याचे नामकरण केले गेले आहे. या हॉटेलात तब्बल १० हजार खोल्या आहेत.

या हॉटेलचे डिझाईन दार अल हंदाशाह यांनी केले असून हॉटेलच्या इंटिरियरचे काम लंडनच्या अरीन हॉस्पिटॅलीटी कंपनीने केले आहे. घुमट असलेल्या मध्य इमारतीभोवती चारी बाजूने ४५ मजली उंच टॉवर्स बांधले गेले आहेत. यात १० हजार खोल्यांबरोबरच ७० रेस्टॉरंटस, १ मॉल, १ मोठा प्रार्थना हॉल, अंडरग्राउंड पार्किंग आहे. बांधकाम खर्च आहे ३५० कोटी. या १२ इमारतीतील दोन पंचतारांकीत सुविधांनी युक्त तर बाकीच्या फोर स्टार आहेत. चार टॉवर्सवर हेलिपॅडची सोय आहे. वाळवंटात येणार्‍या प्रवाशांना आकाशातूनही वाळवंटाचे सौंदर्य निरखता यावे असा यामागे उद्देश आहे.

हे हॉटेल प्रामुख्याने हज यात्रींसाठी बांधल्याचे सांगितले जात असले तरी अन्य पर्यटकांनीही येथे आकर्षित व्हावे असाही त्यामागे हेतू आहे. या हॉटेलमधील कांही मजले शाही परिवारासाठी राखून ठेवण्यात आले असल्याचेही समजते.