रेल्वेत प्रवाशांना ५० रुपयात मिळणार चिकन बिर्याणी

indian-railway
नवी दिल्ली – आयआरसीटीसीने रेल्वेप्रवाशांना रेडी टू ईट मील उपलब्ध करविण्यासाठी कंबर कसली असून यासाठी देशभरात ४ प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत रेल्वे पीएसयू आयआरसीटीसी असून या प्रकारचा पहिला प्रकल्प दिल्ली-एनसीआरमध्ये आणि दुसरा अहमदाबादमध्ये सुरू करण्याची योजना आखली आहे.

अलिकडेच रेडी टू ईट मीलचे ३२००० पॅक आयआरसीटीसीने प्रायोगिक तत्वावर बनविले आणि ते लोकांना देऊन पाहणी केली. लोकांचा प्रतिसाद पाहून आयआरसीटीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ए.के. मनोचा खूपच उत्साहित आहेत. रेल्वे स्थानक आणि रेल्वेगाडय़ांमध्ये आयआरसीटीसीने ५० रुपयात चिकन बिर्याणी आणि ४० रुपयात राजमा चावल विकण्याची योजना बनविली आहे. अधिकृत सूत्रानुसार रेल्वे मंत्रालय ऑक्टोबर महिन्यापासून देशाच्या सर्व ए आणि ए वन वर्गवारीच्या स्थानकांवर रेडी टू ईट सेवा सुरू करणार आहे. यांतर्गत प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे पर्याय स्वस्त दरात उपलब्ध होतील.

ऑक्टोबर महिन्यापासूनच या पूर्ण योजनेचा औपचारिक प्रारंभ केला जाईल, परंतु रेल्वेने आतापासूनच लोकांमध्ये याच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. सध्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जन आहारच्या स्टॉलवर रेडी टू ईट पदार्थ विकले जात आहेत. प्रवाशांसाठी येथे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. या सेवेच्या प्रचारादरम्यान चिकन बिर्याणी किंवा दाल चावल फक्त ३२ रुपयात दिले जात आहे, परंतु ही किंमत केवळ योजनेच्या प्रचारासाठी आहे. या योजनेसाठी रेल्वेने आयटीसी आणि एमटीआर समवेत इतर कंपन्यांसोबत चर्चा केली होती. परंतु कंपन्यांकडून अधिक किंमत आल्याने करार होऊ शकला नव्हता.

Leave a Comment