‘आयआयटी’मध्ये मिळणार विदेशी विद्यार्थ्यांनाही प्रवेश

iit
नवी दिल्ली: ‘आयआयटी’ या भारतातील सर्वोच्च तंत्रशिक्षण संस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आणि या संस्थेची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी ‘आयआयटी’मध्ये पात्र परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय आयआयटी संस्थेने घेतला आहे; अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत बोलताना दिली.

पहिल्या टप्प्यात अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदिव, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि इथियोपिया येथील विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या देशांमध्ये ‘जेईई’ची प्रवेश परिक्षा घेण्यात येणार असून पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

परदेशी विद्यार्थ्यांनी ‘आयआयटी’मध्ये प्रवेश घेतला; तरी त्यांचा अतिरिक्त आर्थिक भार सरकारवर पडणार नाही. संपूर्ण प्रवेश शैक्षणिक खर्च परदेशी विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्कातून वसूल केला जाणार आहे; अशी ग्वाही जावडेकर यांनी दिली.

परदेशी विद्यार्थ्यांना सामावून घेण्याच्या निर्णयाने भारतीय विद्यार्थ्यांच्या जागा कमी केल्या जाणार नाहीत. परदेशी विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा तयार केल्या जातील. भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये कोणताही फरक असणार नाही; असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment