‘याहू’ला उतरती कळा; होणार विक्री!

yahoo
नवी दिल्ली – गुगलच्या पाठोपाठ जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या ‘याहू’ची विक्री होणार असून ३३ हजार ५०० कोटी रूपयांना याहूचा व्यवसाय व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे. गुगल आणि फेसबुककडून गेल्या अनेक वर्षांपासून ‘याहू’ ला कडवी झुंज मिळत आहे. ‘याहू’च्या नफ्यात देखील या कंपन्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे.

व्हेरिझॉनच्या ‘एओएल इंटरनेट’ व्यवसायाला ‘याहू’सोबत झालेल्या या करारामुळे तेजी मिळेल. गेल्याच वर्षी व्हेरिझॉनने एओएलला ४.४ अरब डॉलमध्ये विकत घेतले होते. या विक्रीनंतर याहूचा ऑपरेटिंग कंपनी म्हणून असलेला प्रवासदेखील संपुष्टात येईल. तसेच, यानंतर ‘याहू’ची केवळ ‘याहू जापान’मध्ये ३५.५ टक्के आणि चीनच्या ई-कॉमर्स कंपनी ‘अलीबाबा ग्रुप होल्डिंग’मध्ये १५ टक्के हिस्सेदारी राहिल.

व्हेरिझॉन सध्या ‘याहू’चा मूळ व्यवसाय खरेदी करणार आहे. या व्यवहारात ‘याहू’च्या मालमत्तेचा समावेश असला तरी ‘याहू’च्या पेटंटचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. ‘याहू’चे बाजारमूल्य ३ हजार ७४१ कोटी डॉलर्स आहे. तर ‘याहू’च्या मूळ व्यवसायाचे बाजारमूल्य २४ हजार ७०० कोटी रूपये आहे.

Leave a Comment