पुण्यातही पोकेमॉन फिव्हर

pokemon
पोलिसांनी नाकारली पोकेवोकला परवानगी
पुणे: जगभरातील डिजिटल गेमिंगप्रेमींना वेड लावणाऱ्या पोकेमॉनचे लोन शहरातही मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे दिसून येत आहे. या पोकेमॉनप्रेमींची ठिकठिकाणी झुंबड उडत असून अनेक ठिकाणी वाहतूककोंडीसारख्या कारणांसाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागत आहे. पोकेमॉनच्या स्वागतासाठी फर्गसन रस्त्यावर आयोजित करण्यात आलेल्या पोकेवोकला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

कोथरूडच्या मल्टीप्लेक्सजवळ शुक्रवारी तरुण तरुणींची मोठी झुंबड उडालेली दिसून आली. हा जमाव एवढा मोठा होता; की काही विपरीत घडण्याची शंका येऊन स्थानिक नागरिकांनी अलंकार पोलीस चौकीत त्याची माहिती कळविली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना लक्षात आले की ही गर्दी ‘पोकेमॉन’साठी आहे. अखेर पोलिसांनी त्या तरुणांना आपापल्या घरी पिटाळले आणि गर्दी पांगवली.

मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटीकेजवळ याच प्रकारची पुनरावृत्ती घडून आली. या ठिकाणी ‘पोकेमॉन गो’ उपलब्ध होत असल्याची अफवा वाऱ्यासारखी फैलावली आणि हजारो युवक आपल्या मोबाईलसह त्या ठिकाणी धावले. फर्गसन रस्त्यावरही असाच प्रकार घडला. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना आता चोरटे, मद्यपि यांच्यासह आता पोकेमॉन चाहत्यांच्या गर्दीवरही लक्ष ठेवावे लागत आहे.

Leave a Comment