ग्राहकसेवा सुधारा अथवा कारवाईला सामोरे जा

rbi
रिझर्व बॅंकेची सर्व बॅंकांना कडक तंबी

नवी दिल्ली: मोठमोठ्या थकीत कर्जामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांची आर्थिक स्थिती खालावली आहे; त्याच प्रमाणे या बॅंकांमधून दिल्या जाणाऱ्या ग्राहक सेवेचा दर्जाही खालावल्याचे शिखर बॅंकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बॅंकांनी ग्राहक सेवेचा दर्जा त्वरित सुधारावा; अन्यथा कडक कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी; अशी तंबी शिखर बॅंकेने दिली आहे. या सुधारणांकडे शिखर बॅंक काटेकोरपणे लक्ष ठेवणार आहे.

बॅंकेमध्ये ग्राहकांना सन्मान्य वागणूक मिळावी. त्यांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. सर्व प्रकारच्या ग्राहकांना समान सेवा देण्यात यावी. त्यात कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नये. बॅंकांची धोरणे सुस्पष्ट असावी आणि ग्राहकांकडून सेवांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये; असा सेवा सुधारणांचा पंचसूत्री कार्यक्रमच रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दिला आहे.

वास्तविक मागील अर्थी वर्षातच ग्राहक सेवा सुधारण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने नियमावली जारी केली होती. त्यानुसार बॅंकांनी ३१ जुलै २०१५ पर्यंत सेवा सुधारणेसाठी आपापले नियम तयार करणे बंधनकारक होते. त्यानुसार बहुतेक सर्व बॅंकांनी हे नियम तयारही केले. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ग्राहक सेवेचा दर्जा खालावलेलाच राहिला. त्यामुळेच शिखर बॅंकेने सर्व बॅंकांना पुन्हा एकदा सेवांचा दर्जा सुधारण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment