कोंबड्या रोखणार मलेरीयाचा फैलाव

hen
अदीस अबाबा: कोंबडीच्या पंखांमधून आणि शरीराच्या अन्य भागातून पाझरणाऱ्या एका विशिष्ट रसायनांमुळे डास पळ काढत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे मलेरियाचा फैलाव रोखण्यास कोंबड्या प्रभावी ठरू शकणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

इथिओपियातील अदीस अबाबा विद्यापीठ आणि स्वीडनचे कृषी विद्यापीठ यामधील शास्त्रज्ञांनी केलेल्या संयुक्त संशोधनामध्ये डासांना कोंबडीच्या आणि अन्य काही पक्ष्यांच्या शरीरातून पाझरणाऱ्या विशिष्ट द्रावाचा वास आवडत नसल्याने ते त्यांच्यापासून दूर पळतात; असे निष्पन्न झाले. त्यासाठी संशोधकांनी हे रसायन कोंबडीच्या पंखाखालून वेगळे काढून त्याचा वापर केला. त्याचप्रमाणे मच्छरदाणीत झोपलेल्या माणसांजवळ जिवंत कोंबडी ठेवूनही डासांच्या वर्तनाचे निरिक्षण केले. त्यामध्ये कोंबडीपासून डास दार पळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोंबडीच्या शरीरात मिळणाऱ्या या रसायनांचा वापर करून डासांना दूर ठेवणारे क्रीम तयार करता येईल का; याचा अभ्यास सुरू ठेवणार असल्याचे या संशोधनात सहभागी झालेले शास्त्रज्ञ हाबते तंगी यांनी सांगितले.

संपूर्ण जगभर डासांमुळे फैलावणाऱ्या मलेरियाचे उच्चाटन हे मोठे आव्हान आहे. विशेषतः: आफ्रीका आणि आशिया खंडात हे आव्हान अधिक बिकट स्वरूपाचे आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आकडेवारीनुसार केवळ आफ्रीका खंडात मलेरियामुळे या वर्षात चार लाखांहून अधिक बळी गेले आहेत. या नव्या संशोधनामुळे मलेरियाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment