बकासूर थाळीची चव चाखलीत?

bakasur
खाण्याचे शौकीन कुठे काय हटके मिळतेय याच्या शोधात नेहमीच असतात. आजकाल विविध प्रकारच्या थाळी भोजनाची लोकप्रियताही वाढू लागली आहे. कुठली थाळी मस्त यावर पैजाही लागतात. बकासूर थाळी या विचित्र नावाने अशीच एक थाळी लोकप्रिय झाली आहे आणि विशेष म्हणजे ती खाण्यासाठी संबंधित ठिकाणी जायलाच हवे असेही नाही कारण ती ऑनलाईन विक्रीसाठीही उपलब्ध आहे. भारताच्या विविध राज्यात ही थाळी आपले नांव गाजवते आहे.

या थाळीला बकासूर हे नांव जरा हटकेच आहे. कारण बकासूर नावाचा राक्षस होता व तो गाडाभर अन्न एकावेळी खात असे. त्याचा वध भीमाने केला अशी पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे. ही थाळी राक्षसी म्हणावी इतकी मोठी आहे. नावाप्रमाणे तिचा आकार अवाढव्य तर आहेच पण या थाळीत तब्बल १०० प्रकारचे वेगवेगळे पदार्थ चाखण्याची संधी आहे. ही थाळी एका वेळी पाच सहा जणांना पोटभरीचा आनंद देऊ शकते. तिचा उगम झालाय गुजराथच्या सुरत शहरात.

या महाप्रचंड थाळीत ५५ प्रकारच्या शाही भाज्या, २१ प्रकारच्या मिठाया, १५ प्रकारच्या रोटी, ७ प्रकारच्या कोशिंबिरी शिवाय चटण्या, लोणची, भात असा मेनू असतो. त्यामानाने ही थाळी स्वस्तच म्हणायला हवी कारण तिची किंमत आहे १५०० रूपये. आता कांही ठिकाणी ती २ ते ३ हजार रूपयांनाही विकली जाते असेही समजते.

Leave a Comment