गुगलचे भारतीय रेस्टॉरंट बादल

badal
परदेशात कामकाजानिमित्ताने जाणार्‍या भारतीयांना सुरवातीचे कांही दिवस तरी आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांची आठवण थोडी नॉस्टॅल्जिक बनवत असतेच. सिलीकॉन व्हॅलीत कार्यरत असलेल्या भारतीय कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे व तेथील कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना खूष ठेवण्यासाठी बरेच कांही करतही असतात. मात्र त्यात सर्वात आघाडीवर आहे गुगल. गुगलने आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोफत जेवण ठेवले आहे आणि अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तेथे मिळण्याची व्यवस्था केली आहे. भारतीयांसाठी गुगलने खास रेस्टॉरंटही मुख्यालयात सुरू केले असून बादल नावाचे हे रेस्टॉरंट गतवर्षी सुरू करण्यात आले आहे.

भारतीय कर्मचारी भारतीय रेस्टॉरंट असावे अशी मागणी बरेच दिवसांपासून करत होते. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये सीटईन जॉईंटही आहे. म्हणजे येथे बसून पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुविधा आहे. या रेस्टॉरंटची सजावटही खास भारतीय आहे. बॉलीवूडची पोस्टर्स, भारताचे झेंडे, नकाशे यांच्या रंगात हे रेस्टॉरंट रंगले आहे. विविध भारतीय पदार्थांबरोबर येथे बादल राईस हा खास प्रकारही मिळतो. टिक्की, दाक्षिणात्य खाद्यपदार्थ, थाळी, आणि अनेक प्रकारच्या मिठाया यांचा स्वाद येथे चाखता येतो. दररोजचा मेनू वेगळा असतो पण त्यातही चिकन बिर्याणी आणि मसाला चहा अधिक फेव्हरिट आहेत.

येथे स्पेशल जेवणाचाही एक प्लान आहे. त्याला म्हणतात ब्राह्मण. ज्यांना सात्विक भोजन हवे आहे त्यांच्यासाठी येथे पूर्ण शाकाहारी जेवण दिले जाते. पदार्थ त्वरीत हवे असतील तर बाहेरच एक ट्रक उभा असतो, त्याचे नांव आहे बिजली. येथे आपल्या वडापावच्या गाडीप्रमाणे झटपट पदार्थ दिले जातात. विशेष म्हणजे भारतीय पदार्थांच्या आस्वादात अन्य देशीय मंडळीही आघाडीवर आहेत.

Leave a Comment