जिवाला शांतता देणारा चेंबर

chamber
आजकालच्या धावपळीच्या आणि गोंगाट हीच ओळख बनलेल्या जगात चार घटका जिवाला शांतता देऊ शकेल अशी जागा मिळणे शक्यच नाही असे वाटत असेल तर तुमचा हा समज चुकीचा आहे. अगदी एकांतात जरी गेलो तरी कांही ना कांही आवाज ऐकायला येत असतातच. मात्र आवाजापासून पूर्ण मुक्ती देणारी जागा जगात आहे आणि तिची गिनीज बुकमध्ये नोंदही झालेली आहे. ही जागा कुठे आहे हे कळले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. कारण ही जागा आहे जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात. येथे कोणताही आवाज ऐकू न येणारी एक खास खोली बनविली गेली आहे. येथे इतकी शांतता आहे की तेथे ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणेही असह्य होते.

या चेंबरची खासियत म्हणजे तेथे आवाज शोषून घेणारी यंत्रणा चहूबाजूने बसविली गेली असून ही यंत्रणा कोणताही आवाज ९९.९९ टक्के शोषून घेते. यामुळे थोडा वेळ या चेंबरमध्ये थांबले तर आपल्याला आपल्याच हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकता येतात इतकेच नाही तर आपल्या शरीरातून वाहणार्‍या रक्ताची स्पंदनेही जाणवतात. पोटातील गुरगुर ऐकू येते. या चेंबरमधील सर्व आवाज टिपून घेण्यासाठी अल्ट्रा अॅबझॉर्बरचा वापर केला आहे आणि ही मशीन्स थंड ठेवण्यासाठी सेंट्रल हेवी एअरकंडिशनिंगचा वापर केला जातो. हा चेंबर वेगवेगळे आवाज टेस्ट करण्यासाठी तयार केला गेला आहे. केवळ मोबाईल व्हायब्रेशन्सचा आवाजच नाही तर मानवी शरीरात होत असलेले वेगवेगळे आवाज, कार डॅशबोर्डचा आवाज म्हणजे निर्जीव व सजीव आवाजातला फरक येथे जाणून घेतला जातो. येथली असह्य शांतता माणसाला फार काळ सहन करता येत नाही असाही अनुभव आहे.

Leave a Comment