निवृत्त झालेल्या व्यक्तींचे आयुष्य भारतात बिकट

retired
नवी दिल्ली – इतर देशांच्या तुलनेत भारतात नोकरीतून निवृत्त झालेल्या व्यक्तींचे आयुष्य सर्वात बिकट असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. भारताला नॅटिक्‍सिस ग्लोबल ऍसेट मॅनेजमेंटच्या चौथ्या जागतिक निवृत्ती निर्देशांकात (जीआरआय) शेवटच्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

या संशोधनात जगातील एकूण ४३ देशांतील निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ३४ देश हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्गीकृत केलेले प्रगत देश, आर्थिक सहयोग व विकास संघटनेचे (ओईसीडी) सदस्य असलेले पाच देश तर ब्रिक्‍स संघटनेतील चार देशांचा समावेश होता. निर्देशांकात देशाचे स्थान ठरविण्यासाठी त्या देशातील पाच वर्षांचा मुलभूत व्याजदर आणि महागाईच्या सरासरीचा अभ्यास करण्यात आला.

गेल्यावर्षी नॅटिटिक्‍सकडून एकूण १५० देशांतील निवृत्त व्यक्तीसाठी असलेल्या सुविधांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता. त्यात भारताला ८८वे स्थान प्राप्त झाले होते. परंतु ब्रिक्‍स देशांमध्ये भारताची कामगिरी सर्वात खराब असल्याचे समोर आले होते. २०१४मध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी ५० टक्के लोक दारिद्य्ररेषेखाली होते. २०५० सालापर्यंत एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोक ज्येष्ठ नागरिक असतील, असे हेल्पएजच्या एका अहवालातून समोर आले होते.

Leave a Comment