सामान्य श्रेणीतून रेल्वे प्रवास करणार्या प्रवाशांसाठी प्रवासाची गुणवत्ता वाढविणारे दीनदयाळू कोच रेल्वेने उपलब्ध केले असून अशा पहिल्या विना आरक्षण कोचचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. या कोचमध्ये प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी, मोबाईल चार्जिंग पॉईंट तसेच जैव शौचालय सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर सामान ठेवण्यासाठी जादा रॅक, हुक अशा सुविधाही पुरविल्या गेल्या आहेत. तसेच एलईडी लाईट, आगप्रतिबंधक उपकरणेही बसविली गेली आहेत.
सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी आरामदायी दिनदयाळू कोच
या विषयी बोलताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, रेल्वेच्या अर्थसंकल्पातच ही घोषणा केली गेली होती व जास्त मागणी असलेल्या रूटवर हे कोच एक्स्प्रेस व मेल अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांसाठी जोडले जाणार आहेत. या प्रकारचा एक कोच बनविण्यासाठी रेल्वेला ८१ लाख रूपये खर्च येणार आहे. यावर्षात असे ७०० कोच बनविले जाणार आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच तेजस, हमसफर, फिर उदय व अंत्योदय अशा योजनाही आणत असल्याचे सांगून ते म्हणाले दीनदयाळू कोच हे सामान्य श्रेणीतील प्रवाशांच्या हितासाठी मोदी सरकार प्रतिबद्ध असल्याचे उदाहरण आहे.