ग्रामीण चिमण्यांपेक्षा शहरी चिमण्या अधिक कजाग

sparrow
शहरातून आजकाल चिमणी दिसणे दुरापास्त झाले असले तरी ग्रामीण भागातील पक्ष्यांपेक्षा शहरी भागातील पक्षी अधिक आक्रमक व कजाग असतात असा नवा शोध नुकताच लागला आहे. यासाठी प्रामुख्याने चिमणी वर्गातील पक्ष्यांवर लक्ष केंद्रित केले गेले होते. व्हर्जिनिया टेक्निकल व रेडफोर्ड विद्यापीठ, अमेरिका येथील संशोधकांनी या संदर्भातली निरीक्षणे नोंदविली असून हे संशोधन जर्नल बायोलॉजी लेटर्समध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या अभ्यासासाठी संशोधकांनी ३८ ग्रामीण व ३५ नागरी चिमण्यंाची निरीक्षणे नोंदविली. तीन शहरी व तीन ग्रामीण भागांची निवड त्यासाठी करण्यात आली होती. या पक्ष्यांना अ्रोळखण्यासाठी त्यांच्या पायात धागे बांधले गेले होते. संशोधनाचे प्रमुख स्कॉट डेव्हीस या संदर्भात म्हणाले ग्रामीण भागातील निरीक्षणात असे दिसून आले की चिमण्यांच्या वस्तीभागात अन्य चिमण्या वा पक्षी आले तर तेथील चिमण्यांनी फारसा कोलाहल केला नाही अथवा त्यांची वर्तणूकही थोडी समजुतीची होती. मात्र नागरी भागात एकतर जागा कमी असल्याने व त्यामुळे स्पर्धा आपोआपच वाढत असल्याने नागरी चिमण्या जादा आक्रमक होत्या.

दुसर्‍या भागातून आलेले पक्षी अथवा अन्य चिमण्यांनी या चिमण्यांच्या वास्तव्यजागी येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हुसकून लावण्यासाठी या चिमण्या जोरजोरात आवाज करणे, जोराने पंख फडकाविणे असे प्रकार करताना आढळल्या.ब्रिडींग सिझनमध्ये तर त्यांची वर्तणूक अधिकच आक्रमक होती. शहरी भागात लोकसंख्या वाढीमुळे या पक्ष्यांच्या निवासस्थानांवर माणसांकडून आक्रमण केले जाते म्हणजे अनेकदा झाडे तोडून, टेकड्या सपाट करून घरे बनविली जातात व त्यामुळे या पक्ष्यांना राहण्यासाठी जागा कमी मिळते. अर्थात शहरी भागात हे पक्षी अॅडजस्ट करून घेण्यातही यशस्वी होतात असेही दिसून आले.

Leave a Comment