केरळातील ‘ती’ बेटे होऊ शकतात नामशेष

keral
कोच्ची – समुद्राची पातळी वाढल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली व ‘बॅकवॉटर’मुळे तयार झालेली केरळातील छोटी बेटे नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही सुंदर छोटी छोटी बेटे दक्षिण केरळातील कोलम जिल्ह्यातील अस्थमुडी सरोवर आणि कालडा नदीच्या प्रवाहात आहेत. मात्र, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ही बेटे भविष्यात नामशेष होतील अशी भीती स्थानिक प्रशासनाने वर्तविली आहे.

ही बेटे मुनरो थुरू ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. पर्यावरणाच्या दृष्टीने या घडामोडी धोकादायक असल्याने हे संकट टाळण्यासाठी पर्यावरण संरक्षक संघटना आणि राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे ठरविले आहे. एक एकर ते एक हेक्टर क्षेत्रफळ असलेली ही बेटे दिवसेंदिवस आकुंचित होत आहेत. या निर्जन बेटावरील भूमी लोकांनी खरेदी केली होती आणि तिथे त्यांनी वस्तीही केली होती. मात्र, दिवसेंदिवस ही लहान बेटे पाण्याखाली जात असल्याने आणि बेटावरील भूमी समुद्राच्या खार्‍या पाण्याने व्यापल्याने येथे राहणे नागरिकांना दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे.

मुनरो थुरू ग्रामपंचायतचे अध्यक्ष बिनू करुणाकरन यांनी माध्यमांशी बोलताना या नैसर्गिक संकटावर शास्त्रीय पद्धतीने मात करण्यासाठी आमच्या जवळ पुरेसा निधी नसल्याने आमच्या समोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे सांगितले. अनुपम सौंदर्य, सदाहरित वृक्ष, सर्वत्र हिरवेगार वातावरण यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची या बेटांना नेहमीच पहिली पसंती असते. मात्र, ही सुंदर व मनमोहक बेटे समुद्रात बुडण्याच्या भीतीमुळे स्थानिक लोकांवर व पर्यटन व्यावसायिकांवरही संकट कोसळले आहे.

ही बेटे वाचविण्यासाठी शाश्‍वत व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे आम्ही ठरविले आहे, असे बिनू करुणाकरन म्हणाले. या बेटांच्या सभोवताल खारफुटी वनस्पतीची लागवड ती सुरक्षित राहू शकतील, असा आम्हाला विश्‍वास असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने आणि भौगोलिक रचनेत बदल झाल्याने ही बेटे वेगाने आकुंचित होत आहेत, अशी माहिती राजकीय कार्यकर्ते के. मधू यांनी दिली. मात्र, कुठल्याही परिस्थितीत ही सुंदर बेटे वाचवायचीच असा निर्धार केरळमधील पर्यावरण संस्था आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी कृतिकार्यक्रमाची आखणीही त्यांनी केली आहे.

Leave a Comment