मुंबई : अमेरिकेतील ‘ग्रॅव्हिटी पेमेंट्स’ या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ डॅन प्राईसचे आभार मानण्यासाठी त्यांचा ६ महिन्यांचा पगार साठवला आणि सीईओला ‘तेसला मॉडेल एस’ (Tesla Model S) ही लॅव्हिश कार भेट म्हणून दिली. तुम्हाचा विश्वास बसणार नाही.
सीईओने स्वत:चा पगार घटवून वाढवला कर्मचाऱ्यांचा पगार!
पण आता तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की कर्मचाऱ्यांनी ऐवढी महागडी कार सीईओला गिफ्ट का दिली? त्याचे झाले असे की कर्मचाऱ्यांचा पगार डॅन प्राईसने वाढवला होता आणि त्याचे आभार मानण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हा खटाटोप केला.
डॅन प्राईसने सर्व कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगारात तब्बल ७० हजार डॉलरपर्यंत म्हणजेच ४६,९६,६५० लाख रुपयांपर्यंत वाढवला होता. कर्मचाऱ्यांच्या आनंदाला या निर्णयामुळे पारावर उरला नव्हता. कारण त्यांचा पगार अक्षरश: दुप्पट झाला होता. त्यानंतर डॅन एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने स्वत:चा १.१ मिलियन डॉलर (७,३८,०९,९४५ रुपये) पगार कमी करून सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणेच ७० हजार डॉलर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
सीईओच्या या निर्णयामुळे ‘ग्रॅव्हिटी पेमेंट्स’च्या भारावलेल्या कर्मचाऱ्यांनी डॅन प्राईसला सरप्राईज देण्याचे ठरवले. सर्व १२० कर्मचाऱ्यांनी सीईओला नवी कोरी ‘तेसला मॉडेल एस’ ही त्याची ड्रीम कार भेट म्हणून दिली. तेसला मॉडेल एस’ या कारची किंमतच मुळात ७० हजार डॉलर आहे. स्वत: डॅन प्राईसने ही आनंदाची बातमी फेसबुकवर शेअर केली.
सीईओ डॅन प्राईसला त्याची ड्रीम कार गिफ्ट म्हणून देण्याची कल्पना २४ वर्षांची सिंगल मदर असलेल्या अलिसा ओ’नीलची होती. सिंगल मदर असल्याने पगारवाढीचा निर्णय तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. कर्मचाऱ्यांनी डॅनला कार गिफ्ट केल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ ‘ग्रॅव्हिटी पेमेंट्स’ने यू ट्यूबवर शेअर केला आहे.