महिला उद्योजकतेतून समृध्दी

bachat-gat
आपल्या देशामध्ये गरिबी रेखा आणि त्या खाली जगणारे लोक यांचे विविध प्रकारचे आकडे नेहमीच जाहीर केले जात असतात. परंतु संयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या एका पाहणीमध्ये दारिद्य्र रेषेची एक वेगळीच व्याख्या केली आहे. ज्या कुटुंबाचे दररोजचे उत्पन्न ३.१० डॉलर्सपेक्षा कमी असेल त्या कुटुंबाला गरीब समजावे असे ही व्याख्या सांगते. त्यातल्या त्यात १.९० डॉलर किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणारे लोक अती दरिद्री समजावेत असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. या गरीब लोकांना पुरेसे अन्नसुध्दा मिळत नाही आणि जगातील १० टक्के लोक पोटभर जेवायलासुध्दा मोताद आहेत. त्यांच्या कुटुंबांचे राहणीमान वाढवायचे असेल तर त्यांच्या सध्याच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये काही तरी बदल होण्याची गरज आहे. या लोकांना फार किरकोळ कामे करावी लागतात आणि त्यातून त्यांची उपजीविका नीट साधली जात नाही. अशा कुटुंबातील महिलांना विशेषतः अती दरिद्री कुटुंबातील महिलांना लहान प्रमाणावर कर्जे देऊन स्वयं रोजगार करण्यास प्रवृत्त केले तरच त्यांची उपासमारीतून आणि दारिद्य्रातून सुटका होणार आहे.

मेटलाईफ या संस्थेने अविकसित देशातील काही महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला तेव्हा त्यांच्या उत्पन्नात ३७ टक्के वाढ झाल्याचे आढळले. महिलांना उद्योजक बनवण्याच्या या उपक्रमामध्ये मेटलाईफ या संस्थेने उल्लेखनीय काम केलेले आहे. दर महिन्याला ठराविक आणि पुरेसा पगार मिळवणारी कुटुंबे जगात कमीच आहेत. बाकीच्या लोकांना स्वतःच्या कसबावर आधारलेल्या स्वयंरोजगारावर अवलंबून रहावे लागते. अशा अल्प उत्पन्न गटातील महिलांना उत्पन्नात वाढ करणार्‍या या उपक्रमात सहभागी केले तर त्यांना दारिद्य्र रेषेच्या वर आणण्यास मदत होईल. मेटलाईफ फौंडेशनने या महिलांना बँक खाती उघडायला लागली आणि त्यांना मोबाईल फोनवरून बँकेचे व्यवहार कसे करावेत याचे प्रशिक्षण दिले. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडला. नेपाळ हे तर जगातले अतीशय अविकसित राष्ट्र आहे. देश मागासलेला असला तरी देशाच्या लोकसंख्येपैकी ३३ टक्के लोकांकडे मोबाईल फोन आहेत. परंतु बँक खाते असणार्‍या लोकांची संख्या मोजली असता ती केवळ १४ टक्के भरली. मोबाईल हातात असणे आणि बँक खाते असणे या दोन्हींचा तसा परस्परांशी काही संबंध नाही. परंतु मेटलाईफने मात्र तसा तो प्रस्थापित करून दाखवला आणि हातात मोबाईल असणार्‍या सर्वांना स्वतःची बँक खाती उघडण्यास प्रवृत्त केले.

यातल्या बहुसंख्य महिलांचा आयुष्यात कधी बँकेशी संबंध आला नव्हता. मेटलाईफचा तिथे काही प्रयत्न सुरू असतानाच त्या भागाला भूकंपाचा जोरदार धक्का बसला आणि आधीच कमी असलेल्या वाहतुकीच्या सोयी उद्ध्वस्त होऊन गेल्या. त्यामुळे वाहतूक, प्रवास या गोष्टी दुरापास्त होऊन गेल्या. मात्र ही कसर मोबाईलने भरून निघू शकते हे लक्षात आल्यामुळे जी कामे प्रवास करून करावी लागत होती ती आता फोनवरून व्हायला लागली. नेपाळमध्ये बँकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे लोकांना पैसे फार सांभाळावे लागतात. अशा कठीण परिस्थितीत तिथल्या महिलांना स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून द्यावी लागली. शिवाय बँक, सरकारी कार्यालये यांच्याशिवाय कमी कामे करावीत याचेही शिक्षण देण्यात आले. नेपाळमधले बरेच लोक चीन, ब्रह्मदेश, भारत या देशात जाऊन व्यापार करतात आणि त्यांच्याकडून त्यांच्या घरी पाठवला जाणारा पैसा हा अर्थव्यवस्थेचा मोठा आधार आहे. म्हणून हा देशामध्ये येणारा पैसा मोबाईल बँकिंगवरून सुरळीतपणे यावा साठी प्रयत्न झाले आणि तसा तो यायला लागला. हे काम सुरळीत झाल्यामुळे पैशाचा ओघसुध्दा वाढला आणि त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले. बर्‍याच महिलांनी छोटे छोटे स्वयंरोजगार सुरू करून आपल्या उत्पन्नात भर टाकली.

असेच प्रयत्न पॅराग्वा याही देशात झाले आणि तिथल्या २४ हजार कुटुंबांना दारिद्य्र रेषेखालून दारिद्य्र रेषेच्यावर आणण्यास मदत झाली. या महिलांना आपल्या घरातसुध्दा सोयी उपलब्ध करून घेता येत नव्हत्या. त्यांच्या घरात गॅस नव्हते. प्रगत पध्दतीने वापरल्या जाणार्‍या शेगड्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा बराच वेळ इंधन शोधण्यात आणि घरकाम करण्यात वाया जात होता. आता त्यांच्या घरातली कामे एरवीच्या निम्म्या वेळात व्हायला लागली आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या उद्योगाला जास्त वेळ आणि अधिक शारीरिक कष्ट प्रदान करता आले. त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. लोकांच्या घरात किंवा शेतात काबाडकष्ट करून त्यांना फार कमी पैसे मिळत होते आणि तिथे त्यांना जास्त राबावे लागत होते. आता त्यांचे उत्पन्नही वाढले आणि कष्टही कमी झाले. परिणामी त्यांना आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या आरोग्याकडे तसेच शिक्षणाकडेही लक्ष देता येत आहे. एकंदरीत स्वयंरोजगाराने आणि तंत्रज्ञानाच्या वापराने या कुटुंबाचे राहणीमान सुधारले आहे.

Leave a Comment