श्रीखंड महादेव यात्रा सुरू

shrikhand1
हिमाचलच्या कुल्लु जिल्ह्यातील श्रीखंड महादेव यात्रेला शुक्रवार पासून सुरवात झाली असून ही यात्रा दहा दिवस चालणार आहे. या नैसगिक महाप्रचंड शिवलिंगाची पूजा पांडवांनी केली होती असेही सांगितले जाते. अतिशय खडतर अशी ही यात्रा आहे व यंदाच्या वर्षी या यात्रेला २० हजार भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रेकरूंना पहाडावर जाण्यापूर्वी शारिरीक फिटनेसचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा साधारण ३० किमी अंतराचा ट्रेकच आहे आणि यात १७६०० फूट उंचावर शिव\लिंलिग पूजेसाठी जावे लागते.

ही यात्रा सिमल्यापासून साधारण १५० किमी वर असलेल्या जाओन व सिंहगड येथून सुरू केली जाते. हे शिवलिंग ७२ फूट उंचीचे असून ते नैसर्गिकरित्याच तयार झालेले आहे. येथे महादेव श्रीखंड स्वरूपात ध्यान करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मागची कथा अशी सांगतात की भस्मासूर नावाच्या राक्षसाने शंकराची घोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या भोळ्या शंकराने भस्मासुराला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने तो ज्या वस्तूला स्पर्श करेल ती भस्म व्हावी असा वर मागितला आणि शंकराने तो दिला. मात्र या वराने भस्मासूर ज्या त्या गोष्टीचे भस्म करू लागला व त्याला प्रचंड गर्व झाला. त्या भरात तो शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी आला तेव्हा शंकराने पलायन करून या पहाडावर आश्रय घेतला. अखेर विष्णुने मोहिनी रूप धारण करून या संकटातून सुटका केली.

shrikhand
विष्णुने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला भुरळ पाडली. मोहिनीने तिच्याबरोबरीने भस्मासूर नृत्य करेल तर त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची तयारी दाखविली. भस्मासुराने त्याला मान्यता दिली तेव्हा मोहिनीने नृत्य करता करता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला ते पाहून भस्मासुरानेही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला व तो स्वतःच जळून भस्म झाला अशी ही कथा.

श्रीखंड महादेव यात्रा मार्गावर यंदा प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने ही यात्रा अधिक खडतर बनली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यंदा या यात्रेसाठी प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी चार बचाव पथके तसेच १ वैद्कीय पथकही तैनात केले आहे.

Leave a Comment