रेल्वेला मिळणार त्रिनेत्र

trinetra
रेल्वे गाड्या लेट होण्याच्या अनेक कारणातील एक कारण म्हणजे धुके. मात्र आता दाट धुक्यातही रेल्वे गाड्या वेळेवर आणि नेहमीच्या स्पीडनेच धावणार आहेत. रेल्वे विकास विभागाने डेव्हलप केलेले त्रिनेत्र हे डिव्हाईस या कामी अत्यंत उपयुक्त ठरते आहे. या उपकरणाच्या सहाय्याने इंजिन ड्रायव्हर इंजिनमध्येच एका मॉनिटरवर पुढचे रूळ तसेच सिग्नलही पाहू शकणार आहेत. या उपकरणाचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी खासगी कंपन्यांची संपर्क केला जात असून अनेक विदेशी तसेच देशी कंपन्यांनी त्यात रूची दाखविली आहे.

या उपकरणात व्हीडीओ कॅमेरा व मॅपिंग महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत धुके पडलेले असेल तर रेल्वे कमी स्पीडने चालविल्या जातात. दाट धुके असेल तर हा स्पीड आणखीनच कमी करावा लागतो. अशावेळी सिग्नल क्राॅस होऊ नये याचीही काळजी चालकाला घ्यावी लागते. त्रिनेत्र मध्ये इंजिनापुढे हाय रेझोल्युशन ऑप्टीकल व्हिडीओ कॅमेरा, इन्फ्रा रेड कॅमेरा, तसेच रडार आधारित मॅपिंग सिस्टीम चा समावेश आहे. या तिन्हीच्या मदतीने इंजीनाच्या पुढचे रूळ व सिग्नल यांची माहिती मॉनिटरवर दिसते व त्यानुसार रेल्वेचा स्पीड कमी जास्त करणे चालकाला शक्य होते. पाऊस, वादळातही रूळावर झाडे पडली असतील अथवा खांब पडले असतील तर त्याचीही माहिती याच मॉनिटरवर दिसू शकते असे समजते. त्रिनेत्र उत्पादनासाठी भारतातील खासगी कंपन्यांप्रमाणेच इस्त्रायल, फिनलंड, अमेरिका, ऑस्ट्रीया या देशातील कंपन्यांनीही रस दाखविला आहे.

Leave a Comment