भारत तिबेट सीमेवरचे शेवटचे गांव माणा

mana
ब्रदिनाथापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेले माणा हे गांव भारत तिबेट सीमेवरचे भारतातले शेवटचे गांव आहे. सांस्कृतिक वारशाने संपन्न असलेल्या या छोट्याशा गावात पर्यटकांनी आवर्जून पाहायलाच हवीत अशी अनेक स्थळे आहेत. प्रचंड थंडीमुळे या गावात वर्षातले सहा महिने केवळ बर्फाचे साम्राज्य असते व येथे राहणारे रडंपा जमातीचे लोक या काळात चमोली मध्ये येऊन राहतात. येथे असलेले एकमेव इंटर कॉलेजही सहा महिने माणात तर सहा महिने चमोलीत चालविले जाते. बर्फ काळात पांढरे धोप दिसणारे हे गांव एप्रिल मे महिन्यात हिरवळीने खुलू लागते. येथील बटाटा विशेष प्रसिद्ध आहे व येथे आपले ऋषीमुनी ज्या भूर्जपत्रांवर ग्रंथ लिहित असत त्या भूर्जपत्रांची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. कांही काळापूर्वी या ठिकाणी येणे अत्यंत अवघड होते मात्र आता येथे जाण्यासाठी रस्ता बांधला गेला आहे.

mana2
समुद्रसपाटीपासून सुमारे १४ हजार फूट उंचीवर असलेल्या या गावात ४०० लोकवस्ती आहे व साधारण ६० घरे आहेत. येथे व्यास गुफा, गणेश गुफा, भीम पूल, सरस्वती नदी, वसुधारा अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी येथे आढळतात. असे सांगितले जाते की व्यास गुहेतून व्यासांनी महाभारत सांगितले व ते गणेशाने गणेश गुफेत बसून लिहून घेतले.

mana3
येथे सरस्वती नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने धबधब्यासारखा कोसळतो व येथेच खाली सरस्वती नदी गुप्त झाली आहे. पांडवांना स्वर्गात जाण्यासाठी नदी ओलांडून जायचे होते मात्र खोल दरीमुळे नदी ओलांडणे शक्य नव्हते म्हणून भीमाने एक प्रचंड शिळा या दरीवर टाकली ती भीमपूल म्हणून ओळखली जाते.

mana1
येथून थोडे अंतर ट्रेक करून गेल्यानंतर वसुधारा हा प्रचंड मोठा प्रपात आहे. ४०० फूट उंचीच्या या धबधब्याचे पाणी पापी लोकांच्या अंगावर पडत नाही असाही समज आहे. या गावाच्या टोकाला असलेले चहाचे दुकान हे भारतातले उत्तर सीमेवरचे शेवटचे दुकान आहे. येथे भारत तिबेट सुरक्षा दलाचा बेसही आहे.

Leave a Comment