गोव्यातील समुद्राला प्लास्टिक कचर्‍याचा विळखा

goa
मुंबई – मोठ्या प्रमाणावर सापडणार्‍या प्लास्टिक कचर्‍यामुळे गोव्यातील सागरी जीवन धोक्यात आले असल्याचे एका अभ्यासान्ती स्पष्ट झाले आहे. हा निष्कर्ष गोव्यातील राष्ट्रीय समुद्रीशास्त्र अभ्यास संस्थेतर्फे तेथील शास्त्रज्ञांनी व संशोधकांनी संयुक्तपणे मांडलेल्या अहवालात मांडण्यात आला आहे.

या विषयी सलग ६ महिने संस्थेतील अभ्यासकांनी संशोधन केले. यावेळी असे निदर्शनास आले की समुद्रातील जहाजांसाठी व सागरी जीवसृष्टीसाठी समुद्रकिनार्‍यावरील प्लास्टिकचा कचरा प्रचंड मोठा धोका ठरत आहे. याशिवाय प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांमुळेही जहाजांना धोका उद्‌भवत असल्याचे यात म्हटले आहे. प्लास्टिकचे हे लहान लहान कण सागरी किनारपट्टी, नदीमुखे आणि सागरी पर्यावरणासाठी प्रचंड धोकादायक ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे.

यावेळी गोव्यातील केरी, कलंगोट, वॅगेटर, कोलवा, मोबोर, गल्गिबाग आदी समुद्रकिनार्‍यांचा अभ्यास करण्यात आला. या सहा समुद्रांवरून सुमारे ३००० सूक्ष्म प्लास्टिक कण गोळा करण्यात आले. जानेवारी ते जून २०१५ मध्ये हा अभ्यास करण्यात आला. गोवा समुद्री किनारपट्टीलगत अशाप्रकारे प्लास्टिकचे सूक्ष्मकण बनविणारी एकही कंपनी, उद्योग नसल्याने हे कण नेमके कुठून येतात याचीही कारणे यावेळी शोधण्यात आली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय समुद्री मार्गातून जहाजांच्या दळणवळणादरम्यान सहजच बाहेर सांडणारी द्रव्य हेच यामागील कारण असावे असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. अरबी समुद्राला मिळणार्‍या नद्यांमधून मात्र हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण निश्‍चितच येत नसावेत, असेही शास्त्रज्ञांनी यामध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान, हे संशोधन महुआ सहा, एस वीरासिंगम, व्ही सुनील, पी. येथामोनी, अँड्रीआ कार्मेलिटा रॉड्रीग्स, सौरव भट्टाचार्य आणि बी. जी.नाईक यांनी केले.

Leave a Comment