गंगाजल विक्री मोहिमेला प्रचंड प्रतिसाद

gangajal
मोदी सरकारने पोस्ट कार्यालयांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपर्‍यात पवित्र गंगाजल बाटल्यांमधून पोहोचविण्याच्या मोहिमेला १० जुलै रोजी सुरवात केल्यानंतर गेल्या कांही दिवसांत या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व मनोज सिन्हा यांनी या योजनेचे उद्घाटन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या योजनेखाली पश्चिम बंगालमधील ४७ मुख्य पोस्ट कार्यालयात ही योजना सुरू झाली व पहिल्या दोन दिवसांतच तेथे विक्रीसाठी आलेल्या गंगाजलच्या सर्व बाटल्या संपल्या. सध्या बाटलीतून विक्रीसाठी येत असलेले गंगाजल ऋषिकेश येथून येत आहे. गंगोत्रीहूनही गंगाजल आणले जात आहे. या बाटल्या २०० व ५०० मिलीच्या आहेत. ऋषिकेशच्या गंगाजल बाटल्यांसाठी अनुक्रमे १५ व २५ रूपये किमत आहे. मात्र गंगोत्रीहून येणार्‍या बाटल्या २५ व ३५ रूपयांना मिळतील असे समजते.

बिहारच्या सुल्तानगंज येथेही गंगा प्रदूषणरहित आहे. त्यामुळे तेथूनही गंगाजल आणले जाणार आहे. इच्छुक ग्राहक ऑनलाईनवरही गंगाजल ऑर्डर करू शकतात व हे गंगाजल त्यांना पोस्टाने घरपोच मिळणार आहे. अर्थात त्यासाठी स्पीड पोस्टचा चार्ज द्यावा लागेल असेही स्पष्ट केले गेले आहे.

Leave a Comment