प्रत्येक महिन्याला वाढणार रॉकेलचा दर

kerosene
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आपल्या मालकीच्या तेल कंपन्यांना देण्यात येणा-या अनुदानाचे ओझे कमी करण्यासाठी केरोसिनच्या किमतीत वाढ करण्याचा अधिकार कंपन्यांना दिल्यामुळे २५ पैसे प्रतिलिटर या दराने केरोसिन पुढील १० महिन्यांपर्यंत महाग होईल. १ जुलै रोजी केरोसिनच्या किमतीत २५ पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच ही वाढ करण्यात आली.

एप्रिल २०१७ पर्यंत प्रतिलिटर २५ पैसे किमतीत वाढ करण्याचा अधिकार पेट्रोलियम मंत्रालयाने कंपन्यांना दिला असे वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. पीडीएस योजनेंतर्गत केरोसिनची विक्री करण्यात येत असल्याने त्याचा मोठय़ा प्रमाणात परिणाम दिसून आला नाही. केरोसिनच्या किमतीत वाढ करण्यापूर्वी दिल्लीत १४.९६ पैसे दराने विक्री करण्यात येत होती. जून २०११मध्ये प्रतिलिटर २.६४ रुपयांनी केरोसिन महागले होते. त्यापूर्वी जून २०१०मध्ये ३.२३ रुपये प्रतिलिटर किंमत वाढविण्यात आली होती. २०१५-१६मध्ये पेट्रोलियम कंपन्यांना देण्यात आलेल्या २७,५७१ कोटी रुपयांच्या अनुदानात ४१.७ टक्के हिस्सा केरोसिनचा होता. संपुआ सरकारच्या कालावधीत डिझेल प्रतिमहिना ५० पैशांनी महाग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a Comment