दोन भागात विभागलेले नैसर्गिक शिवलिंग

kathgarh
हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील काढगढ महादेवाचे मंदिर जगातले एकमेव असे शिवमंदिर आहे जेथे नैसर्गिक शिवलिंग तर आहेच पण ते दोन भागात विभागले गेलेले आहे. या प्राचीन मंदिरातील हे शिवलिंग अर्धनारीनटेश्वराचे प्रतीक मानले जाते. म्हणजे ते शिवपार्वतीचे प्रतीक आहे. अष्टकोनी आणि काळ्याभुर्‍या रंगाच्या या शिवलिंगातील मोठ्या भागाची उंची ७ ते ८ फूट आहे तर पार्वतीचे प्रतीक मानल्या गेलेल्या भागाची उंची ५ ते ६ फूट इतकी आहे.

या शिवलिंगाचे आणखीही एक वैशिष्ठ आहे व त्यासाठीही हे स्थान जगभरात प्रसिद्ध आहे. ग्रह, नक्षत्रे व ऋतुनुसार या शिवलिंगाचे दोन्ही भाग आपोआपच दूर जातात व आपोआपच पुन्हा जुळूनही येतात. उन्हाळ्याच्या दिवसांत हे शिवलिंग दोन वेगळ्या भागात दिसते तर हिवाळ्याच्या दिवसांत ते पुन्हा एकरूप होते. शिवरात्रीच्या सुमारास हे शिवलिंग एकरूप झालेले दिसते.

हे प्राचीन मंदिर त्रेतायुगातील असल्याची श्रद्धा आहे. त्रेता युगात रामरायांचे बंधू भरत त्यांच्या आजोळी म्हणजे कैकेय देशात जेव्हा जेव्हा येत असत तेव्हा या मंदिरात ते शिवलिंगाची पूजा करत असे सांगितले जाते. जगज्जेता अलेक्झांडर यानेही या शिवलिंगाचे दर्शन घेतले होते व मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली होती असेही पुरावे आहेत. महाराजा रणजीतसिंग सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

Leave a Comment