गुगल ट्रान्सलेशनचा अजब ‘जावईशोध’

google
पुणे: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलवर आपण काहीही टाकले तरी त्याची क्षणात माहिती मिळते हे काही आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. माहिती देण्याबरोबरच भाषांतरासारख्या अन्य सुविधा देखील गुगलने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र यावरून अवलंबून राहणे हे केवळ महागातच पडते असे नाही, तर काहीवेळा ते हास्यास्पदही होते याचा नमुना गुगल ट्रान्सलेशनने दाखवला आहे. याच गुगल ट्रान्सलेटरवर तुम्ही हिंजवडी असे इंग्लिशमध्ये टाकले तर तुम्हाला चक्क ‘ते घरी परतले नाहीत’ असे भाषांतर पाहायला मिळते. त्यामुळे हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

सध्याच्या काळात कोणत्याही क्षेत्रातील ‘ज्ञान’ प्राप्त करून घेण्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या आधारे एका ‘क्लिकवर’ उपलब्ध असलेली माहिती वापरण्यावर मोठा भर आहे. मात्र ज्ञान नसताना मिळालेली माहिती आणि केवळ तंत्रज्ञानाच्या आधारावर अवलंबून राहणे किती धोकादायक आहे,याचे हे जिवंत उदाहरण आहे.
हिंजवडीचे गुगलवर उपलब्ध असलेले विक्षिप्त भाषांतर हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याची चर्चा केली जात आहे. ही शक्यता नाकारता येत नसली तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याची मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे हे यावरून दिसून येते. या हास्यास्पद प्रकाराबरोबरच गुगलचे भाषांतर जसेच्या तसे वापरणे किती निरुपयोगी आहे याचा पडताळा कोणीही, कुठलाही एखादा इंग्लिश परिच्छेद गुगलवरून भाषांतरीत करून त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ कितपत स्पष्ट होतो यावरून येऊ शकेल.

Leave a Comment