हरिद्वारची कावड यात्रा २० जुलैपासून सुरू

kavad
हरिद्वार- येत्या २० जुलैपासून सुरू होत असलेल्या कावड यात्रेसाठी हरिद्वार प्रशासन तसेच रेल्वे विभागाने तयारी पूर्ण केली आहे. यंदाच्या कावड यात्रेला ३ कोटींहून अधिक भाविक येतील असा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या आहेत तर रेल्वेने भाविकांसाठी सहा जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. स्टेशनवरील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कांही एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे बदलण्यात आले आहेत.

कावड यात्रा हा भारतीय संस्कृतीतला एक भावनिक बंध मानला जातो. या दिवशी खेड्यातून तसेच आसपासच्या अनेक गांवातून कावडी हरिद्वारला येतात, तेथील गंगाजल आपल्या घागरीतून भरून पायी परत गांवी जातात आणि आपल्या गावातील भोलेनाथाला या पाण्याचा अभिषेक करतात. येताना रेल्वे अथवा बसमधून येणारे हे भाविक परतीचा प्रवास मात्र पायीच करतात. आधुनिक जीवनशैली व पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावातही हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा बंध आजही टिकून आहे. विशेष म्हणजे या कावडींत युवकांचा भरणाच अधिक असतो. हरिद्वारला ही यात्रा गेल्या २० वर्षांपासून भरविली जात आहे. श्रावणच्या पहिल्या दिवसापासून ही यात्रा सुरू होते ती महाशिवरात्रीपर्यंत चालते.

कावड यात्रेचे संदर्भ फार पूर्वीपासून मिळतात. त्यावेळी कावड यात्रा सध्याच्या झारखंडमधल्या वैद्यनाथधाम येथून गंगाजल नेऊन केली जात असे. येथून हे जल प.बंगालमधल्या तारकनाथ येथे नेले जात असे. शंकराची पूजा बेल व पाण्याने अभिषेक करून करण्याची प्रथा आहे. अमृतमंथनातून निघालेले हलाहल हे विष महादेवाने प्यायले व ते त्याच्या गळ्यात साठविले अशी पुराणातील कथा आहे. या विषामुळे महादेवाचा कंठ निळा झाला व त्यावरून त्याला निलकंठ असेही नांव पडले. या विषामुळे त्याच्या घशाची आग झाली व ती कमी करण्यासाठी शंकराच्या पिंडींवर जलाभिषेक केला जातो.

शंकराला गंगाजल अधिक प्रिय आहे व म्हणून कावडी गंगाजल नेऊन त्याचा अभिषेक आपल्या गावातील शिवमंदिरात करतात. कांही जण नवस म्हणून ही यात्रा करतात. भगव्या वस्त्रातील कावडींचे तांडेच्या तांडे या दिवसात हरिद्वारला येतात व हे पाहण्यासाठी पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

Leave a Comment