बँकेच्या दोन दिवसीय संपाला स्थगिती

high-court
नवी दिल्ली – बँक कर्मचारी संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन दिवसांचा संप तात्पुरता स्थगित केला असून अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव सी. एच. वेंकटाचलम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बँकांचे केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. त्यासाठी १२ आणि १३ जुलै रोजी दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला होता.

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी संप मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमुर्ती व्ही.के. राव यांनी स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँकेच्या चार सहयोगी बँकांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात हा आदेश जारी केला आहे. न्यायालयाने स्टेट सेक्‍टर बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचा दोन दिवसांचा संप मागे घेण्यास सांगितले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी होईपर्यंत संप करता येणार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार आहे.

Leave a Comment