तामिळनाडूतील कॉंग्रेसचे आमदार एच. वसंतकुमार हे राजकीय नेते असले तरी मुळात व्यापारी आहेत आणि त्यांची राज्यामध्ये रिटेल स्टोअर्सची साखळी आहे. त्यांच्या या मालमत्तेची आजची किंमत ९०० कोटी रुपये आहे. अतीशय कमी शिक्षण असलेल्या वसंतकुमार यांनी करोडपती होण्याची केलेली ही वाटचाल कोणाही उद्योजकाला प्रेरणा देणारी आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात एक साधा सेल्समन म्हणून केली. त्यावेळी त्यांच्या खिशात २२ रुपये होते परंतु त्यांच्या एका मित्राने त्यांच्याकडून एकही पैसा न घेता आपले जनरल स्टोअर्स त्यांना भागीदारी तत्वावर चालवायला दिले. तिथून वसंतकुमार यांची नोकरीकडून उद्योगपती होण्याकडे वाटचाल सुरू झाली.
२२ रुपयांपासून ९०० कोटी रुपयांपर्यंत
एक दुकान यशस्वीरित्या चालवल्यानंतर त्यातून दुसरे दुकान उभे केले पाहिजे असा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यातून राज्याच्या विविध भागांमध्ये तसेच केरळ आणि पुडुचेरीमध्ये ६४ दुकाने उभी केली. त्यांनी ही दुकाने उघडताना शहरातल्या दुकानदारांशी स्पर्धा करण्याचे टाळले आणि खेड्यामध्ये अधिक दुकाने उघडली. खेड्यातल्या लोकांकडे पैसा नसतो त्याचा विचार करून त्यांनी आपली वस्तू विकण्याची एक वेगळीच युक्ती शोधून काढली. त्याच्या गिर्हाईकांनी एखादी वस्तू घेतली की त्या वस्तूची निम्मी किंमत ते ग्राहकांकडून घेत असत. बाकीचे निम्मे पैसे त्यांनी सहा महिन्यांनी द्यावेत अशी सवलत ते देत असत. त्यामुळे त्यांचे ग्राहक दुसरी वस्तू खरेदी करताना पहिले पैसे हमखास देत असे. त्यातून त्यांचा धंदा वाढत गेला आणि आज ते ६४ दुकानांचे मालक आहेत.