या जगन्नाथ मंदिरात नाही मूर्ती

marda
देशभर जगन्नाथ मंदिरातून रथोत्सवाची धूम सुरू आहे. १५ जुलैपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे व जगभरात प्रसिद्ध असलेल्या जगन्नाथपुरीच्या रथोत्सवसाठी तर लाखो देशी परदेशी भाविक पुरीत जमले आहेत. ओडीशातील गंजाम जिल्ह्यातील मरदा येथील ३०० वर्षे जुन्या जगन्नाथ मंदिरात मात्र अगदी सामसूम आहे. तेथे रथोत्सव होत नाही कारण या मंदिरात मूर्तीच नाहीत. हे मंदिर शरण श्री क्षेत्र या नावाने परिचित आहे आणि त्याच्यामागची कथाही मोठी रम्य आहे. संपूर्ण दगडात हे मंदिर बांधले गेले आहे.

असे सांगतात, १७३३ ते ३५ या काळात हे मंदिर बांधले गेले. मुस्लीम आक्रमणांचा पुरीतील जगन्नाथ मंदिराला धोका निर्माण झाल्यावर या आक्रमणात बलराम सुभद्रा व जगन्नाथाच्या मूर्तीना धोका होऊ नये म्हणून या मूर्ती वरील मंदिरात दोन वर्षे लपवून ठेवण्यात आल्या होत्या. परिस्थिती निवळली तेव्हा या मूर्ती पुन्हा पुरीच्या मंदिरात आणल्या गेल्या. संकटकाळात जगन्नाथाने येथे आश्रय घेतल्याने या मंदिराला शरण श्री क्षेत्र या नावाने ओळखले जाते.

त्याकाळी तेथील राजाने मूर्ती पुन्हा पुरीला हलविल्या गेल्यानंतरही या मंदिरात नवीन मूर्तींची स्थापना केली नाही. त्यामुळे आजही येथे मूर्ती नाहीत. मूर्ती नाहीत त्यामुळे पुजा अर्चा नाही व रथयात्राही नाही. त्या काळीही जेव्हा मूर्ती या मंदिरात लपविल्या गेल्या तेव्हाही तेथे आक्रमकांचे लक्ष वेधले जाऊ नये म्हणून ढोल, ताशे, आरत्या, शंखनाद वगैरे पूजेचे कोणतेही प्रकार केले गेले नव्हते असेही सांगितले जाते.

सध्या हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून त्याचा जीर्णोद्धार केला गेला आहे. गेली आठ वर्षे या मंदिरात पर्यटकांनी यावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व जगापुढे येईल असे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे.

Leave a Comment