२४ तासांमध्ये घरपोच सेवेला ग्राहकांचा नकार

shopping
नवी दिल्ली – काही महिन्यांपूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी घरपोच सुविधा सुधारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत पावले उचलली होती. ३ ते ४ तासांपासून २४ तासांमध्ये घरपोच सेवा देण्याची योजना या कंपन्यांनी सुरू केली होती. मात्र या विशेष सेवेसाठी ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणात शुल्क आकारण्यात येत असे. यामुळे ग्राहकांनी एकाच दिवसात वस्तू घरपोच देण्याचे सेवेला नाकारले आहे.

ऑनलाइन वस्तू खरेदी केल्यानंतर सकाळी घरपोच वस्तू मिळण्यासाठी ग्राहकाकडून १०० ते १५० रुपयांपर्यंत अधिक शुल्क आकारण्यात येत होता. वस्तूचा आकार मोठा असल्यास यापेक्षा अधिक प्रमाणात शुल्क आकारण्यात येई. कंपन्यांच्या या नव्या सेवेमुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली होती. साधारण सेवा दिल्याने होणारे नुकसान यामुळे भरून निघत असे.

फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर ज्या वस्तूच्या समारे इन स्टॉक लिहिलेले असे, त्या ठिकाणी विक्रेत्यांनी ग्राहकांना पिनकोडच्या आधारावर डिलिव्हरीची वेळ सांगितली आहे. ही सामान्यपणे २-३ दिवस, ४-५ दिवस अथवा ४-६ दिवस आहे. मात्र दूर ठिकाणी वस्तू पोहोचण्यासाठी किमान १ ते २ आठवडय़ांचा वेळ लागतो. अॅमेझॉन संकेतस्थळानुसार, वस्तू घरपोच देण्यासाठी २-४ व्यावसायिक दिवस, ४-७ अथवा ५-१४ दिवस लागतात. भारतातील ग्राहकांना जागतिक दर्जाची सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. घरपोच सेवा दुप्पट सुधारण्याचा आपला प्रयत्न आहे, असे अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (ग्राहक सेवा) अखिल सक्सेना यांनी सांगितले.

आपली वस्तू पुरवठा सेवा सुधारण्यासाठी साधारण २५० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे फ्लिपकार्टच्या वतीने सांगण्यात आले. याव्यतिरिक्त स्नॅपडील थर्ड पार्टी सेवा कंपनी गोजावासमधील आपली भागिदारी वाढविण्यासाठी २ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करेल. मोफत घरपोच सुविधा आणि एका दिवसात वस्तू घरपोच करण्यासाठी कंपनीचा मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च होतो. याचबरोबर कंपनीने नफा कमवावा यासाठी गुंतवणूकदारांकडून दबाव टाकण्यात येतो. यामुळे एकाच दिवसात अथवा पुढील दिवशी घरपोच सेवा देण्याची पद्धत कमी प्रमाणात यशस्वी ठरत आहे.

Leave a Comment