देशातली सर्वात जुनी, पुण्याची चिंचेची तालिम

chinch
सुल्तान सिनेमामुळे कुस्ती आखाडे एकदम चर्चेत आले आहेत. पुण्यातील चिंचेची तालिम हा देशातला सर्वात जुना आखाडा असून महाराष्ट्रात कुस्तीच्या आखाड्याला तालीम असे म्हटले जाते. शुक्रवार पेठेतील चिंचेची तालिम पेशव्यांनी १७८६ मध्ये म्हणजे २३३ वर्षांपूर्वी स्थापन केली आहे.

एकेकाळी या तालमीत फक्त १२ पहिलवानांना १० वर्षांचे कुस्तीचे प्रशिक्षण देऊन कुस्तीसाठी तयार केले जात असे. आता मात्र अनेक तरूण येथे कुस्ती शिकत आहेत. कुस्तीगीरांसाठी आखाड्यातली लाल माती म्हणजे दुसरी आईच. ताक, तेल व लिंबू मिसळून ही माती अँटीसेप्टीक बनविली जाते. कुस्तीसाठी येथे पहिलवानांना व्यायाम करता यावा म्हणून कोणतीही मशीन्स वापरली जात नाहीत. कुस्तीगीर बनण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहारविहार यांचे पालन करावे लागते.

या तालमीत आजही शालेय तसेच महाविद्यालयीन तरूण येतात. पहाटे चार पासून त्यांचा दिवस सुरू होतो. सुरवात होते पळण्याच्या व्यायामापासून. फुटबॉलही खेळला जातो. नंतर आखाड्यात कुस्तीचे धडे दिले जातात. न्याहरीसाठी शिरा, ठंडाई असते. दिवसा थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुपारी चार ते साडेसहा पर्यंत पुन्हा जोर, बैठका, कुस्ती प्रशिक्षण होते. त्या नंतर पुन्हा थंडाई दिली जाते. येथले पहिलवान स्वतःच जेवण बनवितात. ही तालिम सर्वांसाठी खुली आहे. तेथे फी आकारली जात नाही फक्त खाणे व राहण्याचे पैसे द्यावे लागतात. जवळच असलेल्या हनुमान मंदिर ट्रस्ट कडून या तालमीसाठी फंड दिले जातात तसेच सधन कुटुंबातूनही दूध, सुकामेवा असे पदार्थ पुरविले जातात. या तालमीच्या कुस्तीगीराने एखादे बक्षीस जिंकले तर तो पैसा त्या पहिलवानालाच दिला जातो असेही समजते.

Leave a Comment