अनावधानाने विंडोज अपग्रेड; मायक्रोसॉफ्टला १०,००० डॉलर्सच्या भरपाईचा आदेश

microsoft
विंडोज ७ किंवा ८ ही ऑपरेटिंग प्रणाली वापरणाऱ्या लोकांना विंडोज १० वापरण्यास भाग पाडण्याची मोहीम मायक्रोसॉफ्टला महागात पडली आहे. एका महिलेकडून अनवधानाने विंडोज १० डाऊनलोड झाल्याबद्दल कंपनीने १० हजार डॉलर्सची भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेतील न्यायालयाने दिला आहे.
आपली परवानगी नसताना संगणक आपोआप अपग्रेड होऊन विंडोज १० स्थापित झाल्याबद्दल एका महिलेने दाखल केलेला खटला मायक्रोसॉफ्टच्या विरोधात गेला आहे, अशी माहिती सिअटल टाईम्स या वृत्तपत्राने दिली आहे.

टेरी गोल्डस्टाईन असे या महिलेचे नाव असून ती ट्रॅव्हल एजंट आहे. अनावधानाने नवीन ऑपरेटिंग प्रणाली डाऊनलोड झाल्यानंतर तिचा संगणक मंदगतीने चालू लागला आणि अनेक दिवस बंद पडत होता. त्यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम झाल्याची तिची तक्रार होती.

मायक्रोसॉफ्ट’च्या ग्राहक सेवा विभागाशी तिने संपर्क साधला परंतु त्यातून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे आपला बुडालेला रोजगार आणि संगणक यांची नुकसान भरपाई म्हणून १०,००० डॉलर्सची मागणी करणारा दावा तिने दाखल केला होता, असे सिअटल टाईम्सने म्हटले आहे.

वास्तविक विंडोज ७ किंवा ८ वापरणाऱ्यांच्या संगणकांच्या पडद्यावर अपग्रेड करून मायक्रोसॉफ्ट’s विंडोज १० स्थापित करण्याचा एक संदेश पॉप अप होऊन येतो. मात्र त्यात ऑपरेटिंग प्रणाली अपग्रेड करण्याचा स्पष्ट उल्लेख नसतो. या पॉप अप विंडोच्या उजव्या कोपऱ्यात फुलीचे (“X”) लाल चिन्ह असते. मात्र या चिन्हावर क्लिक केल्यास ती विंडो बंद होण्याऐवजी अपडेट करण्यासाठी पुष्टी देण्यात येते. त्यामुळे त्यातून अनेकांची दिशाभूल होऊ शकते.

आता ही पद्धत बंद करून फुलीवर टीचकी मारल्यास विंडो बंद होईल, अशी सोय कंपनी करत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय ज्यांच्या संगणकाच्या प्रणाल्या अपग्रेड झाल्या आहेत, त्यांनाही पुन्हा जुनी प्रणाली कार्यरत करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Leave a Comment