योशिमीटी राष्ट्रीय उद्यानातला अद्भूत फायरफॉल

fire
एखाद्या पहाडावरून धबधब्यातून पाण्याऐवजी आगीचे लोळ वाहू लागले तर? अर्थात ज्वालामुखी फुटतात तेव्हा असे प्रकार घडतातही पण ते प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणे कुठे शक्य असते? मात्र तुम्हाला अगदी निर्धोकपणे असा प्रकार पाहायचा असेल तर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील योशिमीटी नॅशनल पार्कला भेट द्यावी लागेल व तीही फेब्रुवारीच्या सुमारास. या उद्यानात या काळात वाहत्या धबधब्याचे पाहता पाहता आगीच्या लोळात रूपांतर होताना दिसण्याची अनोखी संधी मिळते. त्यामुळे या धबधब्याचे नांव फायरफॉल असे पडले आहे.

fire1
हा नक्की काय प्रकार आहे ? तर तो आहे निसर्गाचा चमत्कार. अगदी अवचित शोधला गेलेला. या काळात २ हजार फूट उंचीच्या पहाडावरून कोसळणार्‍या धबधब्यावर होणारी ती सूर्यकिरणांची किमया आहे. बर्फाच्छादित शिखरांवर जसे उगवते सूर्यकिरण पडले की ती शिखरे सोन्याची होऊन जातात, तसाच हा प्रकार. येथे फेब्रुवारीच्या दिवसांत सायंकाळी साडेपाच वाजता सूर्यास्त होतो व त्यावेळी या धबधब्यावर विशिष्ठ कोनातून पडणारी सूर्यकिरणे या पाण्याला चक्क आगीचा रंग देतात. या धबधब्याच्या या किमयेचा शोध १८७० साली अनवधानानेच लागला. त्यावेळी एक हॉटेलमालक त्याच्या पाहुण्यांना घेऊन या पार्कमध्ये गेला होता. वेळ सायंकाळची फेब्रुवारी महिन्यातली. आणि त्यांना हे आश्चर्य पहायला मिळाले. तेव्हापासून ही जागा जगाचे आकर्षण बनली आहे दरवर्षी या स्थळाला अंदाजे ३५ लाख पर्यटक भेट देतात.

Leave a Comment