या केंद्रीय मंत्र्यासाठी सायकल माझी सखी

meghawal
मोदी मंत्रीमंडळात नव्याने नियुक्त झालेल्या २० मंत्र्यांपैकी तीन जणांनी सायकल वरूनच संसदेत येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठीही ते सायकलवरूनच आले होते.

अजुर्न मेघवाल हे बिकानेर राजस्थानचे खासदार दिल्लीत ऑड इव्हन फॉर्म्युला लागू झाल्यापासूनच सायकलने संसदेत येत आहेत. जेव्हा ते प्रथम खासदार बनले तेव्हाही ते सायकलच वापरत होते मात्र तेव्हा त्यांना सुरक्षेच्या कारणावरून सायकल वापरास बंदी केली गेली होती. दुसर्‍यांदा खासदार झाल्यावर मात्र सायकल वापराची परवानगी त्यांना मिळाली आहे. ते म्हणाले मी वाळवंटी भागातला आहे आणि त्यामुळे निसर्ग सांभाळायला हवा याचे मला भान आहे. बिकानेरला असताना पौर्णिमेच्या रात्री ते आजही प्रकाश प्रदूषण कमी व्हावे म्हणून अंधारात रात्र घालवितात. ते सांगतात, कार वापरण्यास माझा विरोध नाही मात्र खरोखरच गरज असेल तरच कारचा वापर करण्यावर माझा भर आहे.

mansukh
मनसुख मांडविया हे गुजराथचे राज्यसभेचे खासदार आता मंत्री बनलेत. ते म्हणतात, सायकल का कार हा मुद्दाच नाही. काम महत्त्वाचे. पर्यावरण संरक्षणासाठी यापुढेही सायकलच वापरणार आहे. मात्र मंत्री पदाची जबाबदारी आली म्हणजे कर्मचारी वाढतात. अशा वेळी गरज असेल तर कार वापरण्यासही माझी हरकत नाही मात्र प्राधान्य नेहमी सायकललाच राहणार.

dave
अनिल दवे हे मध्यप्रदेशातील राज्यसभेचे खासदार आता मंत्री बनले आहेत.त्यांनी पर्यावरण संरक्षण मोहिमेचे नेतृत्त्व केले आहे तसेच नर्मदा आंदोलनाशीही त्यांचा संबंध आहे. त्यांनीही दिल्लीत ऑड इव्हन फॉर्म्युला लागू झाल्यापासून सायकलचाच वापर सुरू केला होता तो ते कायम ठेवणार आहेत. अर्थात जरूरीप्रमाणे कारचा वापरही करेन असेही ते सांगतात.