विदर्भातील शेतकर्‍यांना मिळणार ब्राझील संत्री मोसंब्यांची रोपे

orange
अमरावती जिल्ह्यात मेक इन महाराष्ट्र अंतर्गत शेतकर्‍यांसाठी एक योजना राबविली जात आहे. या योजनेनुसार येथील शेतकर्‍यांना ब्राझील मधून आणलेल्या संत्र्यामोसंब्यांची रोपे दिली जाणार आहेत. या रोपांना सीडलेस संत्री मोसंबी येतात व त्यामुळे त्यातून निघणार्‍या रसाची गुणवत्ता उत्तम असते असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातली संत्री मोसंबी ही मुख्य पिके आहेत मात्र त्यातील बियांमुळे त्यापासून बनणारा ज्यूस कडवट बनतो. ब्राझील मधून आणलेली रोपे कमी जागेत अल्ट्रा डेन्सिटी प्लांटेशनने लावली जाणार आहेत. त्यासाठी नर्सरी सुरू करण्यात आली असून ही रोपे शेतकर्‍यांना दिली जाणार आहेत.त्यापासून ३ ते ४ वर्षात उत्पन्न मिळायला सुरवात होणार आहे. पारंपारिक पद्धतीने घेण्यात येणार्‍या उत्पादनापेक्षा या प्रकारे घेतलेले उत्पादन २०० पट अधिक असते असेही सांगितले जात आहे.

जैन इरिगेशन व महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना शेतीसाठी नवीन शेती तंत्र वापरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे ठरविले आहे. ब्राझील संत्री मोसंब्यांची रोपे १० हजार शेतकर्‍यांना दिली जाणार आहेत. यात २० प्रकारच्या संत्री मोसंबी रोपांचा समावेश आहे. ही फळे जादा गोड व रसरशीत आहेत. आंध्रातील चित्तूर येथील शेतकर्‍यांना अशाच प्रकारे हापूस व तोतापुरी आंबे रोपे देऊन करण्यात आलेला प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे. त्याचा धर्तीवर विदर्भात हा प्रयोग संत्री मोसंब्यांसाठी केला जात आहे.

ब्राझील हा जगातील सर्वात मोठा संत्री मोसंबी उत्पादक देश असून भारतात मिळणार्‍या संत्रे ज्यूस मधील ९९ ट्के रस हा ब्राझील मधून आयात केलेला असतो असेही समजते.

Leave a Comment